सफाई कामगार मातेच्या निवृत्ती समारंभात कारमधून आले जिल्हाधिकारी, चीफ इंजिनीअर अन् डॉक्टर मुलं!रामगढ (झारखंड) : एका टाउनशिपमध्ये सफाई कामगार असलेल्या महिलेच्या निवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभाला जिल्हाधिकारी, रेल्वेचे चीफ इंजिनीअर आणि एक डॉक्टर असा ताफा पोहोचतो आणि सारेच अवाक् होतात. एका साध्या महिलेसाठी एवढे मोठे अधिकारी अचानक कसे आले? असा प्रश्न उपस्थितांना पडतो. पण, हे तिघेही निघतात तिचे पोटची मुलं. एवढ्या मोठ्या पदांवर मुलं पोहोचलेली असताना आपलं कर्तृत्व निवृत्तीपर्यंत मोठ्या कष्टानं आणि नेटानं पार पाडणाऱ्या या महिलेने नवा आदर्श घालून दिला. (वृत्तसंस्था)आईच्याच प्रयत्नामुळे आम्ही मोठे झालो...झारखंडमधील रामगढ जिल्ह्याच्या राजरप्पा टाउनशिपमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमित्रादेवी नुकत्याच निवृत्त झाल्या. निवृत्तीच्या दिवशी नगरपालिकेतर्फे त्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभ सुरू असतानाच, तिथे निळ्या दिव्याची गाडी आली आणि त्यातून बिहारच्या सिवान जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्रकुमार तिथे आले. त्यांच्यापाठोपाठ आणखी दोन आलिशान गाड्या तिथे आल्या. दुसऱ्या गाडीतून रेल्वेचे चीफ इंजिनीअर आणि तिसऱ्या कारमधून डॉक्टर पोहोचले. निरोप समारंभला उपस्थित असणाऱ्यांना हे कोण आणि का इथे आले, हेच कळेना. मग स्वत: सुमित्रादेवी यांनी त्या तिघांची ओळख करून दिली आणि सांगितले की ही तिन्ही आपली मुले आहेत. तिघाही मुलांनी त्यावेळी भाषणे केली. आपण आज आपल्या आईच्या प्रेरणेमुळे आणि कष्टांमुळेच एवढ्या पदापर्यंत पोहोचलो, याचा तिघांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला.
झारखंडमध्ये नवा आदर्श : एका कर्तृत्ववान मातेची हृदयस्पर्शी निवृत्ती
By admin | Published: November 08, 2016 4:06 AM