नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी चार हजार वाहनचालकांना चलन फाडले आहे. वाहतुकीचे नियम तोडण्यावरील कारवाईमुळे आज (सोमवार) हेल्मेट, सीट बेल्ट आदींच्या बाबतीत दिल्लीकर सजग असलेले आढळले.
नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर १ सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांच्या कारवाईचा अंदाज आला नाही. पण, नेमके रविवारीच अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे उपद्रवी चालकांना चांगलाच दणका बसला.
मोक्यावरच ई-चलन फाडण्यासाठी मशीन्स अद्ययावत करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या होत्या. ३१ अॅागस्टच्या रात्रीनंतर कुणाकडूनही रोख चालान वसूल करू नये, असे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. केंद्र व दिल्ली सरकारने याबाबतीत वाहतुक पोलिसांना पूर्णवेळ सतर्क राहण्यास सांगितले आहे. कागदपत्र नसल्यामुळे वाहने ताब्यात घेण्यात आली असतील तर त्या प्रकरणाचा निपटारा महानगर दंडाधिकाºयांच्या न्यायालयात करावा, असेही सांगण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडाची रक्कम मोठी वाटणे स्वाभाविक असून वाहतुक पोलिसांसोबत सल्लामसलत करून दंडासंदर्भात नवी अधिसूचना काढण्यात येईल. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार दिल्ली सरकारला दंडाच्या रकमेत किरकोळ बदल करण्याची मुभा आहे.