ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - केंद्र सरकारने 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद करून इतके महीने लोटले तरी काळा पैसा असलेले आपल्याकडील पैसे बदलण्यासाठी नवनवे फंडे शोधून काढत आहेत. जुन्या नोटा बदलण्यासाठी आता परदेशात कुरिअर पाठवलं जात आहे. कुरिअरने परदेशात जुन्या नोटा पाठवणा-या गॅंगचा कस्टम विभागाने पर्दाफाश केला आहे.
या गॅंगमधील लोक कुरिअरद्वारे परदेशातील आपल्या नातलगांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तींकडे जुन्या नोटा पाठवत होते, जेणेकरून नंतर बदलता येतील. कारण अनिवासी भारतीयांसाठी नोटा बदलण्याची अंतिम तारीख 30 जून ठेवण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या अधिका-यांनी परदेशात पैसे पाठवणा-या काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून लाखो रूपये जप्त करण्यात आले आहेत.
पुस्तकांमध्ये लपवून हे पैसे बाहेर देशांमध्ये पाठवले जात होते. पण बाहेर देशांमध्ये पाठवल्या जाणा-या कुरिअरवर कस्टम विभाग करडी नजर ठेवून असल्याने हा प्रकार उघडकीस आला. अशाप्रकारे पंजाबहून ऑस्ट्रेलियाला पैसे पाठवणा-यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच कोरिया आणि दुबईमध्येही अशाच प्रकारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशांवर आळा घालण्या्च्या उद्देशाने 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता.