नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेकडून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 200, 500, 2000 नंतर आता लवकरच भारतीय नागरिकांना 100 रुपयांची नवी नोट वापरता येणार आहे. 100 रुपयांच्या या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा असणार आहे. या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीची (बावडी) झलक दिसणार आहे. या नोटेचा आकार जुन्या शंभर रुपयाच्या नोटेपेक्षा कमी आहे.
रिझर्व्ह बँकेकडून शंभर रुपयांची नवीन नोट बाजारत येत आहे. मात्र, शंभर रुपयांची जुनी नोटही चलनात असणार आहे. देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात या नोटेची छपाई सुरु झाली आहे. म्हैसूर येथील ज्या प्रिटींग प्रेसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले होते. त्याच, प्रिंटिंग प्रेसमध्ये या 100 रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नोटेसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाई ही स्वदेशी आहे. दरम्यान, भारतीय चलनातील जुन्या 100 रुपयांच्या 100 नोटांचे वजन 108 ग्रॅम होते. तर या नव्या 100 नोटांचे वजन 80 ग्रॅम असणार आहे. साधारणत: ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या नोटा चलनात येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.