ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करुन नव्या नोटा चलनात आणल्यानंतर अजून एक नवी नोट लवकरच चलनात येणार आहे. दहा रुपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. या नव्या नोटेत सुरक्षेसंबंधी काळजी घेण्यात आली असून जुन्या दहाच्या नोटेशी तुलना करता अत्यंत चांगली असल्याचं सांगितलं आहे.
आरबीआय लवकरच महात्मा गांधी सीरीज 2005 च्या अंतर्गत 10 रुपयांची नोट जारी करणार आहे. आरबीआयने सांगितलं आहे की, नव्या नोटेच्या नंबर पॅनलवरील इनसेटमध्ये मोठ्या अक्षरात 'L' लिहिलेलं असेल आणि मागच्या बाजूला 2017 असेल. या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवरील पहिले तीन अंक किंवा अक्षरांचा आकार स्थिर असेल, मात्र त्यानंतर डावीकडून उजवीकडे जाणा-या अंकांचा आकार वाढत्या क्रमाने असेल. आरबीआयने हेदेखील स्पष्ट केलं आहे की जुन्या दहा रुपयांच्या नोटादेखील वैध राहणार असून त्या वापरता येऊ शकतात.
याआधी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी ऐतिहासिक नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. या निर्णयात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे म्हणजे, आता केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयावर सिनेमा बनवण्यात येणार आहे. टॉलिवूडचे दिग्गज सिनेनिर्माता भारतीराजा तामिळ भाषेमध्ये 'नोटाबंदी'वर सिनेमा बनवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'नोव्हेंबर 8...इरावू इत्तू मणि' असे या सिनेमाचे नाव असून त्याचे शुटिंगही सुरू झाले आहे.
सिनेमाचे शुटिंग मुख्यतः चेन्नई आणि पाँडेचेरी येथे करण्यात येणार आहे. सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,'नोटाबंदी निर्णय लागू झाल्यानंतरच्या घडामोडींवर आधारित सिनेमाची कहाणी आहे. सिनेनिर्माता सध्या एका वयोवृद्ध पात्राच्या शोधात आहे. त्यांना हवा तसा व्यक्ती न मिळाल्यास ते स्वतःच ही भूमिका साकारणार आहेत'.