पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्रद्वय तेजप्रताप आणि तेजस्वी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या नामांकनात नमूद केलेल्या वयावरून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने लालूपुत्रांच्या वयातील विरोधाभासाची चौकशी करण्याची मागणी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली.लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी वैशाली जिल्ह्याच्या महुआ विधानसभा मतदारसंघातून सोमवारी भरलेल्या नामांकन अर्जात आपले वय २५ वर्षे सांगितल्याने हा वाद निर्माण झाला आहे. कारण यापूर्वी त्यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यांनी गेल्या ३ आॅक्टोबरला राघोपूर विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या नामांकनात आपले वय २६ वर्षे सांगितले होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंगल पांडेय यांनी निवडणूक आयोगाला या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीची मागणी केली आहे.तेजस्वी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ते दिल्लीच्या आर.के. पुरम येथील डीएव्ही स्कूलमधून इयत्ता नववी उत्तीर्ण झाले असल्याचे सांगितले आहे. परंतु तेजस्वी यांनी पुढेही शिक्षण घेतले असून दहावीचे प्रमाणपत्र जोडल्यास त्यांचे खरे वय कळू शकते, असा दावा पांडेय यांनी केला. (वृत्तसंस्था)
लालूपुत्रांच्या वयातील विरोधाभासाने नवा वाद
By admin | Published: October 07, 2015 3:30 AM