New Parliament Inauguration: २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. असे असले तरी केंद्रातील मोदी सरकारकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमांची सुरुवात अगदी सकाळी ७.३० वाजल्यापासून होणार आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. हा सोहळा किती वेळ सुरू राहील, कधी कोणत्या गोष्टी सुरू होतील, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातील संभावित कार्यक्रम
- सकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत हवन व पूजा. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
- सकाळी ८.३० ते ९ या वेळेत लोकसभेत विधिवत सेंगोलची स्थापना केली जाईल. यासाठी तामिळनाडूच्या मठातील २० स्वामी, संत उपस्थित राहणार आहेत.
- सकाळी ९ ते ९.३० या वेळेत प्रार्थना सभा होणार आहे. यामध्ये शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत.
- दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दुपारी १२ वाजता राष्ट्रगीताने होईल.
- यादरम्यान दोन लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
- राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांच्या संदेशाचे वाचन करतील.
- राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे संबोधित करणार आहेत. (खरगे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्यापही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. ते या पदावर कायम आहेत. काँग्रेसने उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असली तरी, आता विरोधी पक्षनेत्याच्या संबोधनावर साशंकता निर्माण झाली आहे.)
- लोकसभा अध्यक्ष संबोधित करणार आहेत.
- यानंतर नाणी आणि शिक्के प्रसिद्ध होतील.
- शेवटी पंतप्रधान मोदी संबोधित करतील आणि दुपारी अडीच वाजता सोहळ्याची सांगता होईल.