नवी दिल्लीदेशाचे सर्वोच्च प्रतिक असलेल्या नव्या संसद भवानाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्यात आला. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह भाजपचे मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योगपती रतन टाटा यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.
"नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं हे मी माझे भाग्य समजतो", असं रतन टाटा यावेळी म्हणाले. नव्या संसद भवनाचे काम 'टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड'ला देण्यात आले आहे.
देशासाठी ऐतिहासिक दिवस! नव्या संसद भवानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन
सध्याच्या संसद भवनाला ९२ वर्ष झाली आहेत. या संसद भवनाला लागूनच नव्या संसद भवानाची भव्य इमारत उभी राहणार आहे. यासाठी तब्बल ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींनी आज या प्रकल्पाचे भूमीपूजन केले. यावेळी गणेश पूजन आणि विष्णूसह वराहचेही पूजन करण्यात आले. यासोबतच सर्वधर्म प्रार्थनेचेही आयोजन करण्यात आले होते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी नव्या संसद भवनाचे उदघाटन करण्याचा सरकारचा मानस आहे.