New Parliament Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकारण सुरू झालं आहे. देशातील 19 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह 19 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांनी केंद्र सरकारवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले राहुल? यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की, 'राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन न करणे आणि त्यांना या समारंभासाठी निमंत्रित न करणे, हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे. संसद ही अहंकाराच्या विटांनी बनलेली नसून घटनात्मक मूल्यांनी बनलेली आहे', असे राहुल यांनी म्हटले आहे.
28 मे या तारखेवरही प्रश्न काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही उद्घाटनाच्या तारखेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 28 मे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. यंदा त्यांची 140 वी जयंती आहे. आता वीर सावरकरांच्या जयंतीच्या दिनीच संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. यावरूनही विरोधकांनी टीका केली आहे.
या पक्षांकडून बॉयकॉट
संसदेच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १९ पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, एनसीपी, सीपीआय(एम), आरजेडी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम या पक्षांचा समावेश आहे.