Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२८ मे) देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर उपस्थित नव्हते, त्यामुळे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी नवीन संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचा संदेश वाचून दाखवला.
द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचताना हरिवंश सिंह म्हणाले, नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा हा प्रसंग भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा भारताच्या उत्तरेकडील बिंदूपासून दक्षिणेकडील बिंदूपर्यंत आणि पूर्व सीमेपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत विविधतेत राहणाऱ्या सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा प्रसंग आहे. भारतीय संसदेला आपल्या मनात विशेष स्थान आहे. संसद ही आपल्या समृद्ध लोकशाही परंपरांचा प्रकाश स्तंभ आहे.
संबंधित बातमी- संसदेच्या उद्घाटनावर कुणी शवपेटीशी तुलना केली, तर कुणी कलंक म्हटले; विरोधकांच्या प्रतिक्रीया...
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवताना हरिवंश सिंह म्हणाले, २.५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन आधुनिक संसदेची उभारणी झाली, ही आनंदाची बाब आहे. हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. ही नवीन संसद भविष्यातही आपल्या विकासाची साक्षीदार असेल.