ऑनलाइन लोकमतजेरुसलेम, दि. 5 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्रायल दौ-यावर आहेत. या दौ-यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी 7 मोठ्या करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. गंगेची साफसफाई करण्यासंदर्भातही भारत आणि इस्रायलमध्ये करार झाला आहे. मोदी आणि नेत्यानाहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे.या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी भारत आणि इस्रायलमध्ये झालेल्या करारांची माहिती दिली आहे. भारताचा इस्रायलसोबत कृषी क्षेत्रासह अवकाश क्षेत्रात मोठे करार झाले आहेत. नेत्यानाहू यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी पुन्हा एकदा सच्चा दोस्त म्हणून संबोधलं आहे. नेत्यानाहू म्हणाले, काल मोदीजी म्हणाले होते, आपण दोघे मिळून जग बदलू शकतो. पण मला आता असं वाटतंय की, भारत आणि इस्रायल अनेक क्षेत्रांत प्रगती करून नवा इतिहास रचू शकतात. मोदींसोबत काम करायला आम्ही उत्सुक आहोत. दोन्ही देश दहशतवादाचा मुकाबला करत आहेत. आम्ही एकमेकांसोबत मिळून दहशतवादाविरोधात लढणार आहोत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नेत्यानाहू यांचे आभार मानले आहेत. तसेच नेत्यानाहू यांच्यासोबत झालेल्या डीनरचाही शानदार असा उल्लेख केला आहे. मोदी म्हणाले, इस्रायलमध्ये येऊन खूप सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. इस्रायलचे आदरातिथ्य पाहून मी भारावून गेलो आहे. आमच्यात अनेक मुद्द्यावर चर्चा झाली आहे. जगात शांती नांदावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इस्रायल नवीन उपक्रम, पाणी आणि कृषी क्षेत्रात खूप पुढे आहे. भारताच्या विकासासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाची गरज आहे. आम्ही आमच्या मैत्रीचं नातं नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेनंतर 26/11 हल्ल्यात बचावलेल्या मोशेचीही भेट घेतली आहे.(फुलाला दिलं "मोदी" नाव, इस्त्रायलने केला पंतप्रधानांचा सन्मान)("आपका स्वागत है मेरे दोस्त", मोदींचं इस्त्रायलमध्ये हिंदीत स्वागत)भारत आणि इस्रायल भौगोलिक पातळीवर खूपच चिंतीत आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न करू, भारतीतील यहुदी लोक आमच्या नात्याचे दाखले देतात. इस्रायलमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याप्रमाणेच भारतातील अनेक विद्यार्थी इस्रायल विद्यापीठातून शिक्षणाचे धडे गिरवण्याचं स्वप्न बाळगतात, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू, त्यांची पत्नी आणि कुटुंबीयांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. नेत्यानाहू यांनी मोदींचं आमंत्रण स्वीकारलं आहे.
भारत आणि इस्रायल संबंधांचं नवं पर्व
By admin | Published: July 05, 2017 6:00 PM