नवी दिल्ली : शेतक-यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी निर्यातीला चालना देणार असल्याची ग्वाही नवनियुक्त केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. शेतमालाला चांगला भाव मिळणे हा शेतकºयांचा हक्क आहे. त्यामुळे निर्यातीत वाढ होण्यासाठी लवकरच नवे कृषी धोरण तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.दहाव्या ‘अॅग्रिकल्चर लीडरशिप समिट-२०१७’मध्ये मंगळवारी त्यांनी कृषी विकासाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली. कृषी निर्यातीत वाढ होण्यासाठी व्यापारावरील बंधने दूर करावी लागतील. निर्यातक्षम कृषी उत्पादन वाढविण्यासाठी देशातील विविध भागांत ‘कृषी पार्क’ची निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. जागतिक निर्यातीत भारताचा टक्का वाढविण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.डिसेंबरमध्ये अर्जेंटिना येथे जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद होणार आहे. तेथे भारताची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली जाईल. जमीन आणि पाण्याची उपलब्धता मर्यादित असली तरी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढविले जाईल. देशाची गरज भागवून निर्यातवाढीसाठी प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी निर्यातवाढीसाठी लवकरच नवे धोरण,शेतमालाला चांगला भाव देणार : सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:53 AM