प्रशांत किशोर यांच्यासाठी नवीन पद? काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार करण्याचा दुसरा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 09:04 AM2022-04-23T09:04:56+5:302022-04-23T09:05:59+5:30
काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या पंधरा दिवसांत कधीही प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी स्वत:ला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एक वर्षाचा अवधी देण्याची घोषणा केली होती.
शरद गुप्ता -
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासाठी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरचिटणीसांचे (रणनीती) नवे पद निर्माण केले जाऊ शकते किंवा त्यांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या पंधरा दिवसांत कधीही प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी स्वत:ला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एक वर्षाचा अवधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्यासंदर्भातील घोषणा त्या आधीही होऊ शकते. काँग्रेस पक्ष १३ मेपासून उदयपूरमध्ये होणाऱ्या चिंतन शिबिरापर्यंत वाट पाहणार नाही.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांसमक्ष सादरीकरण केले होते. तेव्हाच त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला होता. त्याआधी ते फक्त गांधी परिवारातील सदस्यांचीच भेट घेऊन सल्लामसलत करायचे. त्यांना कोणते पद द्यायचे, याचा निर्णय करायचा असल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या औपचारिक घोषणेला उशीर होत आहे. त्यांना आपली रणनीती अमलात आणण्यात कोणत्या प्रकारचा अडसर येऊ नये, असे एखादे पद त्यांना द्यावे, अशी गांधी परिवाराची इच्छा आहे.
महत्त्व होईल अधोरेखित...
काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार म्हणून त्यांची भूमिका जितेंद्र प्रसाद किंवा अहमद पटेल यांच्यासारखीच असेल. त्यासाठीच रणनीती सरचिटणीस हे नवीन पद प्रशांत किशोर यांच्यासाठी निर्माण केले जाईल. यातून त्यांचे पक्षातील महत्त्व अधोरेखित होईल. भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी विरोधी पक्षांची आघाडी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थापन करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असेल. यात काँग्रेसची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.