शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसला ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत नवा अध्यक्ष मिळवण्यासाठी पक्षाच्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर विचार सुरू झाला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार, नेते राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांचे मन वळविण्याची जोरदार तयारी त्यांचे समर्थक करीत आहेत. दुसरीकडे पक्षाचे इतर मोठे नेेते अध्यक्षपदासाठी निवडणूक होवो किंवा अध्यक्षपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांना दिली जावी यावर अडून बसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी नकार दिल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक होणे निश्चित आहे. बहुतांश नेते (त्यात ग्रुप २३ चे नेतेही समाविष्ट आहेत) प्रियंका गांधी यांना अध्यक्ष बनविले जाण्यास सहमत आहेत. त्यांची भूमिका अशी की, पंजाब आणि राजस्थानमधील पेचप्रसंग सोडविण्यासाठी प्रियंका गांधी ज्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत, त्यातून त्यांची राजकीय समज दिसते. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकींसाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, “निवडणूक घेण्याचा कार्यक्रम प्रस्ताव अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला गेला आहे. आता कार्य समितीला हे ठरवायचे आहे की, निवडणूक कोणत्या तारखेला घ्यायची. जी तारीख ठरवली जाईल, त्यानंतर ४५ दिवसांचा अवधी पाहिजे.” संकेत असेही आहेत, की अध्यक्षपदासाठीच नाही तर कार्य समितीच्या सदस्यांसाठीही निवडणूक होईल. या निवडणुकीची मागणी ग्रुप २३ प्रदीर्घ काळपासून करीत आहे.
पाच नावांचीही चर्चाअध्यक्षपदासाठी ज्या नावांची चर्चा आहे, त्यात गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंह, कमल नाथ, सुशील कुमार शिंदे आणि अशोक गेहलोत यांचा समावेश आहे.