नवी दिल्ली : अवकाशात उपग्रहांमध्ये इंधन भरण्यासाठी केंद्र उभारण्याची शास्त्रज्ञ तुषार जाधव व अश्तेषकुमार या दोन शास्त्रज्ञांची योजना आहे. त्यामुळे उपग्रहांची आयुुष्यमर्यादा वाढणार आहे. या योजनेसाठी त्यांनी आपल्या मानस्तु स्पेस या स्टार्ट-अप कंपनीतर्फे संशोधनाला सुरुवात केली आहे.
तुषार जाधव व अश्तेषकुमार हे दोघेही आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी मानस्तु स्पेस या स्टार्ट-अप कंपनीची स्थापना केली. अंतराळात उपग्रहांमध्ये इंधन भरण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वांना परवडणारे असावे असा या दोन्ही शास्त्रज्ञांचा कटाक्ष आहे. उपग्रहांसाठी सध्या कार्सिकोजेनिक स्वरूपाचे इंधन वापरले जाते. त्याऐवजी हरित इंधन वापरण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. यासंदर्भात मानस्तु स्पेस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले की, सध्या उपग्रहांसाठी वापरण्यात येणारे हायड्रेजीन हे इंधन प्रदूषण करणारे आहे. मात्र, आम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड हे प्रदूषणविरहित इंधन उपग्रहांसाठी विकसित केले आहे. ते कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकते. आम्ही उपग्रहांसाठी तयार केलेले इंधन ते सध्या वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा ५० टक्के अधिक कार्यक्षम आहे.
उपग्रहासाठी लागणारी नवी प्रज्वलन यंत्रणाही मानस्तु स्पेस या कंपनीने शोधून काढली आहे. ती सध्याच्या अशाप्रकारच्या यंत्रणेपेक्षा २० टक्के अधिक कार्यक्षम आहे. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणारे उपग्रह अंतराळ कचऱ्यापासून स्वत:चे संरक्षण करतात. काही इलेक्ट्रिक प्रोपल्शन यंत्रणेच्या तुलनेत मानस्तु स्पेस या स्टार्ट-अप कंपनीने बनविलेली अशा प्रकारची यंत्रणा अधिक गतिमान आहे.
पुढील वर्षी आणखी प्रयोग करणारमानस्तु स्पेस या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व सहसंस्थापक अश्तेषकुमार यांनी सांगितले की, पुढील दशकात सुमारे ५७ हजार उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रोपल्शन यंत्रणेमुळे २० अब्ज डाॅलरची आर्थिक उलाढाल होणार आहे. आम्ही बनविलेल्या तंत्रज्ञानानुसार अंतराळामध्ये उपग्रहात इंधन भरण्याचा प्रयोग पुढील वर्षी करून बघण्याची इच्छा आहे.