नवी दिल्ली - भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. या नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटोही जारी करण्यात आले आहे. परंतु ही नवी नोट जु्न्या नोटेपेक्षा आकाराने वेगळी आहे. यामुळे एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. यासाठी १०० कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच आरबीआयने २०० रुपयाची नोट चलनात आणली होती. त्याचा आकारही नेहमींच्या नोटेपेक्षा वेगळा असल्याने त्यावेळीही एटीएमचे रिकॅलिब्रेट करण्यात आले होते. त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तरीही आरबीआयने १०० रुपयाची नवी नोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. दरम्यान एकदाच रिकॅलिब्रेशन न करता नेहमीनेहमी शिल्लकचा भूर्दंड कशाला असा प्रश्न सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या 100 रुपयांच्या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाई ही स्वदेशी आहे. साधारणत: ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या नोटा चलनात येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.
कशी आहे नोट -
100 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचा (बावडी) फोटो देण्यात आला आहे. देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात 100 रुपयांच्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. म्हैसूर येथील ज्या प्रिटींग प्रेसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले होते. त्याच, प्रिंटिंग प्रेसमध्ये या 100 रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले आहे. तसेच, 100 रुपयांच्या या नव्या नोटेमध्ये मायक्रो सेक्युरिटी फिचर्स असणार आहेत. या नोटेचा आकार जुन्या 100 रुपयांच्या नोटेपेक्षा कमी असून साइज 66 मिमी × 142 मिमी असणार आहे.