नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय रेल्वेने आपल्या नियमांमध्ये थोडा बदल केला आहे. लोअर बर्थ आणि साइड लोअर बर्थचं रिझर्व्हेशन करून प्रवास करणा-यांसाठी हा बदल महत्वाचा आहे. कारण लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेच्या वेळेवर रेल्वेने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे परिणाम होणार आहे. लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अप्पर बर्थपेक्षा एक तास कमी झोपता येणार आहे.
नव्या नियमांमुळे स्लिपर किंवा थर्ड एसीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेतच या श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या जागेचा वापर झोपण्यासाठी करता येणार आहे. लोअर बर्थची जागा सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या पूर्वी बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण आता रात्री नऊऐवजी दहा वाजेपर्यंत लोअर बर्थची जागा बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अप्पर बर्थपेक्षा एक तास कमी झोपता येणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये केवळ बसण्यासाठी रेल्वेतील लोअर बर्थ हे वापरावेत, असे नव्या नियमांमध्ये म्हटले आहे.
जर कोणी गर्भवती, दिव्यांग किंवा आजारी व्यक्ती असेल तर सहप्रवाशांनी त्यांना लवकर झोपू द्यावं अशी विनंतीही रेल्वेकडून करण्यात आली आहे.