नवी दिल्ली : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी रविवारी सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. प्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. विमानतळ, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था राज्यांना करावी लागेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यात कोविड-१९ची लक्षणे आढळल्यास राज्ये त्यांची स्वत:ची क्वारंटाईन किंवा आयसोलेशन व्यवस्था तयार करू शकतात.
२५ मेपासून विमानसेवा सुरू होत असून नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे नियम व मार्गदर्शन रविवारी जाहीर केले. भारतीय रेल्वेनेदेखील एक जूनपासून सुरू होत असलेल्या १०० जोड रेल्वेंची यादी रविवारी जाहीर केली. त्यात दुरोंतो, संपर्क क्रांती,जनशताब्दी आणि पूर्वा एक्स्प्रेसचा समावेश आहे.
विमान उड्डाणांसाठी नियम सगळ््या प्रवाशांनी फेसमास्क वापरले पाहिजे त्यांनी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगचे उपाय राज्यांनी योजले पाहिजेत, विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानक अशा सर्वच महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणांचे नियमित सॅनिटायझेशन झाले पाहिजे.
विशेष परिस्थितीत मिळेल सूट
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीच्या नियमांत १४ दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य आहे. काही ठराविक प्रसंगांत (गरोदरपणा, कुटुंबात मृत्यू, गंभीर आजार इत्यादी) प्रवासी उतरणार असलेल्या राज्यांनी परवानगी दिली तरच १४ दिवसांचे होम क्वारंटाईन मान्य केले जाईल. अॅसिम्पटोमॅटीक (उघड लक्षणे दिसत नसलेले) ट्रॅव्हलर्सना विमानात/जहाजात बसण्याची परवानगी थर्मल स्क्रिनिंग करून दिली जाईल.