ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या रातोरात घेण्यात आलेल्या निर्णयाने संपूर्ण देशभर उद्भवलेली अराजकसदृश परिस्थिती आणि लोकांचा संपत चाललेला संयम याची दखल घेत मोदी सरकारने रविवारी रात्री थोडे नमते घेतले आणि नोटा बदलण्यावर व पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा थोडी शिथिल करून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अर्थात उद्या सोमवारी बँका बंद असल्याने व बहुतांश एटीएम सुरू नसल्याने लोकांच्या हाती ही वाढीव रोकड लगेच पडेलच अशी स्थिती नाही.गेल्या चार दिवसांच्या परिस्थितीचा, नव्या व पर्यायी नोटांच्या उपलब्धतेचा आणि एटीएम यंत्रांच्या फेररचनेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयाने हे दिलासादायक नवे निर्णय रविवारी रात्री जाहीर केले.या नव्या निर्णयातील ठळक मुद्दे असे-- ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मर्यादा चार हजारांवरून ४, ५०० रुपये.- बँक खात्यातून पैसे काढण्याची सध्या दर आठवड्याला असलेली २० हजार रुपयांची मर्यादा वाढवून २४ हजार रुपये.- दिवसाला फक्त १० हजार रुपये काढण्याची मर्यादा रद्द. आठवड्याचे कमाल २४ हजार रुपये एका वेळीही काढता येतील.- एटीएममधून पैसे काढण्याची दैनिक मर्यादा प्रत्येक कार्डाला दोन हजारऐवजी २,५०० रुपये.- बँकांना व पोस्ट आॅफिसना सर्व मूल्यांच्या नोटा व खास करून कमी मूल्याच्या नोटाही देण्याच्या सूचना.- बँकिंग कॉरन्स्पॉडन्टकडूनही खात्यातून २,५०० रुपये काढण्याची सोय.- ५०० रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आल्या व त्याही बँकेतून मिळणार.- वरिष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र रांगा.- नोटा बदलून घेण्यासाठी व बँक खात्यांचे अन्य व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र रांगा.- सरकारी पेन्शनर्सना जिवंत असल्याचे वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत १७ जानेवारी २०१७ पर्यंत वाढविली.- बँकांना मोबाईल वॅलेट््स आणि डेबिट व क्रेडिट कार्डांची संख्या वाढविण्याच्या सूचना.- इस्पितळे, कॅटरर्स, मंडप काँन्ट्रॅक्टर इत्यादींनी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट अथवा आॅनलाइन पेमेंट स्वीकारण्यास नकार दिल्यास जिल्हा दंडाधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याची सोय.- ज्या ग्रामीण भागांमध्ये बँकांची सोय नसल्याने रोकड रकमेची खूप चणचण निर्माण झाली आहे असे भाग शोधून तेथे बँकिंग व्हॅन व बँकिंग कॉरन्स्पॉन्डंटच्या मार्फत लहान नोटांचे वितरण करण्यासाठी बँकांना गरजेनुसार मदत पुरविण्याच्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सूचना.---------------------- गेल्या चार दिवसांत देशभरात लोकांनी ५०० व एक हजार रुपयांच्या रद्द झालेल्या तीन लाख कोटींच्या नोटा बँका आणि पोस्टांत जमा केल्या.- नोटा बदलणे, खात्यातून पैसे काढणे किंवा एटीएमवरून पैसे काढणे अशा स्वरूपात एकूण ५० हजार कोटी रुपये लोकांना देण्यात आले.- बँका व पोस्टांत एकूण २१ कोटी व्यवहार केले गेले.