केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून गरिबांना मोफत रेशन देत आहे. सुमारे ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, आता काही फसवणूक करणारेही या योजनेचा फायदा घेत आहेत. उत्तराखंडमधून धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामध्ये एक टोळी लोकांची कागदपत्रं गोळा करून त्यांच्याकडून सिम खरेदी करत असे. या सर्व बनावट सिमकार्डच्या माध्यमातून लोकांची सायबर फसवणूक करण्यात आली. नुकताच या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
गृह मंत्रालय आणि उत्तराखंड पोलिसांनी मिळून या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे. या सिमकार्डच्या फसवणुकीतून एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. म्हणजेच या लोकांनी आतापर्यंत हजारो लोकांची फसवणूक केली आहे. फसवणुकीच्या या नवीन प्रकारात सिमकार्ड खरेदी करण्याची पद्धतही खूपच मनोरंजक आहे.
कोणालाही सिमकार्ड खरेदी करण्यासाठी ओळखपत्र किंवा फोटो आवश्यक आहे. त्याच वेळी एका व्यक्तीच्या आधार कार्डवर एकूण ९ सिम खरेदी करता येतात. याचाच फायदा आता स्कॅमर्स घेत आहेत. यांनी लोकांच्या घरी जाऊन सरकारी योजनांच्या नावाखाली ओळखपत्र घेतलं आहे. लोकांना मोफत रेशन देण्यात येईल, असं सांगण्यात आलं. तसेच यासाठी त्यांचे आधार कार्ड आणि फोटोही काढण्यात आले. तसेच काही लोकांचं बायोमेट्रिक्सही घेण्यात आलं.
सिमकार्ड खरेदी केल्यानंतर ही संपूर्ण टोळी ते एक्टिव्हेट करायची आणि मग त्यांच्यासाठी बोली लावायची. चीनपासून मलेशियापर्यंतचे सायबर ठग त्यांना हाताशी धरायचे. त्यामुळे नंतर चीनमधून कॉल येतो. आतापर्यंत २० हजारांहून अधिक सिमकार्ड परदेशात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ज्याच्या बदल्यात या टोळीतील लोकांनी लाखो रुपये उकळले होते. या आरोपींकडून पोलिसांनी अनेक सिमकार्ड, बायोमेट्रिक डिव्हाईस आणि मोबाईल जप्त केले आहेत.