नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मात्र कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. काही राज्यात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखं डेंग्यूही आपलं रुप बदलत आहे. रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान जबलपूरमध्ये डेंग्यूचा नवा स्ट्रेन असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत येथे जवळपास 410 रुग्ण आढळून आले आहेत. मध्य प्रदेशमध्ये सध्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
ज्या रुग्णांचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांच्यातही डेंग्यूची काही लक्षणं पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स सातत्याने कमी होत आहे. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. अशातच जबलपूरमध्ये असे अनेक रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यामध्ये फक्त व्हायरल फिव्हरची लक्षणं आढळून आली आहेत. मात्र तरी देखील त्यांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यत: रक्तातील प्लेटलेट्स या एक लाख 50 ते चार लाखांपर्यंत असतात. मात्र आता डेंग्यूमुळे त्या वेगाने कमी होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये डेंग्यूचे थैमान! 10 दिवसांत 45 चिमुकल्यांचा मृत्यू; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. तापामुळे 10 दिवसांत तब्बल 53 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 186 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जवळपास 45 चिमुकल्यांनी डेंग्यूमुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा एका आठवड्यासाठी बंद केल्या आहेत.
रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी
रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच ब्लड बँकेतही मोठी गर्दी झाली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यातील लोकांना डेंग्यूची लागण होत आहे. मथुरामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शेकडो लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाराणसीमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. डेंग्यूमुळे रुग्णांच्या प्लेटलेट्सं कमी होत आहेत. त्यामुळेच ब्लड बँकेत मोठी गर्दी होत आहे. वाराणसीमध्ये 55 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.