नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी)१३ हजार कोटींचे कर्ज बुडवून चुना लावल्याबद्दल ‘सीबीआय’ व ‘ईडी’ला हव्या असलेल्या निरव मोदी या देश सोडून गेलेल्या हिरे व्यापाऱ्याविरुद्ध आता महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) खटला दाखल केला असून त्यात सूरत येथील न्यायालयाने मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.‘डीआरआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरे तर हे प्रकरण ‘पीएनबी’ कर्जघोटाळ््याच्या बरेच आधाचे आहे. फायरस्टार इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल व रॅडाशिर ज्वेलरी या निरव मोदीच्या तीन कंपन्यांनी ‘ड्युटी फ्री’ पद्धतीने आयात केलेल्या पैलू पाडलेल्या हिºयांची व मोत्यांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरून हा खटला आहे. अशा प्रकारे अन्यत्र वळविलेला ‘ड्युटी फ्री’ माल १,२०५ कोटी रुपयांचा होता व त्यावरील दंड व व्याजासह बुडविलेले आयात शुल्क ४८.२१ कोटी रुपयांचे होते. या तिन्ही कंपन्यांचे काम सूरतमध्ये चालते.या कंपन्यांनी हॉँगकाँग व दुबई येथे निर्यात करण्यासाठी पाठविलेली सहा पार्सले ‘डीआरआय’ने डिसेंबर २०१४ मध्ये अडवून तपासली होती. त्यातील मालाचे वर्णन, त्यांचे मूल्य व वजन खोटेपणाने नोंदविण्यात आले होते. त्यातील हिºयांचे ‘एफओबी’ मूल्य ४३.१० कोटी रुपये दाखविले गेले होते. प्रत्यक्षात नंतर सरकारमान्य मूल्यकाराने त्याचे मूल्य फक्त ४.९३ कोटी रुपये ठरविले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर ‘डीआरआय’ने मोदी व त्याच्या कंपन्यांविरुद्ध सूरत येथील न्यायालयात खटला दाखल केला. समन्स काढूनही ठरल्या तारखांना त्यांच्यापैकी कोणीही हजेरी न लावल्याने आता मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.यंदाच्या फेब्रुवारीत ‘डीआरआय’ने आयातशुल्क माफीने आणलेला माल अन्यत्र वळविणे व आयात/ निर्यातीच्या मालाचे वास्तवाहून अधिक मूल्य दाखविणे या संदर्भात आणखी एक गुन्हा मोदी व त्याच्या कंपन्यांविरुद्ध नोंदविला आहे. ‘डीआरआय’च्या म्हणण्यानुसार ज्यावर ५२ कोटी रुपयांचे आयातशुल्क भरावे लागले असते असा ८९० कोटी रुपयांचा माल ‘ड्युटी फ्री’ आणून मोदीने सूरत एसईझेडमधील आपल्या कंपन्यांकडे वळविला, असा कयास असून त्यासंबंधी अधिक तपास सुरु आहे.
निरव मोदीवर नवा खटला; सूरत कोर्टाचे अटक वॉरन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 3:16 AM