नवी दिल्ली: अग्निबाणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेऊन सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित रेटा देऊन इच्छित भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) एक नवे ‘प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान विकसित करीत असून ते यशस्वी झाल्यास तुलनेने कमी खर्चात उपर्गर सोडण्याचे नवे युग सुरु होऊ शकेल. ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ (ईपी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाने सौर ऊर्जेचे विद्युत भर्जेत रूपांतर केले जाते व ही विद्युत ऊर्जा अंतराळात सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित प्रकारे पुढे रेटा देऊन इच्छित कक्षेत ठरलेल्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी वापरली जाते. ५ मे रोजी ‘जीसॅट-९’ हा उपग्रह सोडताना हे तंत्रज्ञान प्रथमच प्रायोगिक स्वरूपात वापरले गेले. अग्निबाणाने उपग्रह गुरुत्वाकर्षण रेषेच्या पलिकडे नेऊन सोडला की पृथ्वीपासून ३६ हजार किमी उंचीवर भूस्थिर कक्षेत नेऊन सोडण्यासाठी त्याला ठराविक वेळेला ठराविक जोराने पुढे रेटा द्यावा लागतो. शिवाय वेळोवेळी कक्षेत फेरबदल करण्यासाठी व १०-१२ वर्षांच्या आयुष्यात त्याला एका जागी स्थिर राहण्यासाठीही इंधन लागते. सध्या ‘इन्सॅट/जी सॅट’ वर्गातील दोन जहार किलो वजनाच्या उपग्रहासोबत ८०० ते एक हजार किलो रासायनिक प्रॉपेलंट सोबत न्यावे लागते. मात्र, आता ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान यशस्वी झाले की जेमतेम १०० ते ३०० किलो रासायनिक प्रॉपेलंट न्यावे लागेल. यामुळे खर्च कमी होईलच. शिवाय जास्त वजनाचा उपग्रह सोडणे शक्य होईल, असे थिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. के, शिवन यांनी सांगितले.अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले की, जीएसएलव्ही एमके -३ या ‘बाहुबली’ अग्निबाणाच्या ५ जून रोजी केलेल्या यशस्वी उड्डाणानंतर ‘इस्रो’ने चार टनापर्यंतचे उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याची क्षमता प्राप्त केली आहे. तरीही ‘जी’ मालिकेतील पुढील उपग्रह ५.६ टन वजनाचा असल्याने, तो फ्रेंच गियानामधीन ‘एरियान’ अग्निबाणाने सोडला जाईल. त्यानंतर, सोडायचा ‘जीसॅट-२०’ उपग्रह फ्रेंच गियानामधून सोडायच्या उपग्रहाहून पाचपट अदिक शक्तिशाली असेल, पण नव्या तंत्रज्ञानामुळे त्याचे वजन ३.५ टनापर्यंत शक्य होईल व त्याचे प्रक्षेपण ‘बाहुबली’ अग्निबाणाने भारतातून केले जाईल.
सौरऊर्जा वापरून उपग्रह इच्छित कक्षेत नेण्याचे नवे तंत्र
By admin | Published: June 19, 2017 1:22 AM