तेलंगणाचे नवे CM रेवंत, योगी आदित्यनाथ यांच्या मार्गावर; शपथ घेण्यापूर्वीच चालवलं बुलडोझर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 07:01 PM2023-12-07T19:01:46+5:302023-12-07T19:02:38+5:30
रेवंत यांनी मुख्यमंत्री निवास स्थानाबाहेरच केली बुलडोझरची पहिली कारवाई...
रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच बरोबर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवत, मुख्यमंत्री होण्यापूर्वीच त्यांनी बुलडोझर कारवाईलाही सुरुवात केली आहे. रेवंत यांनी बुलडोझरची पहिली कारवाई मुख्यमंत्री निवास स्थानाबाहेरच केली. शपथ ग्रहण समारंभापूर्वीच रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री निवास स्थानाबाहेर लावण्यात आलेले फेन्सिंग हटविण्याचे आदेश दिले. या फेन्सिंगमुळे सातत्याने ट्रॅफिक जाम होत होते. यामुळे लोकांना विनाकारणच त्रास होत होता. हे हटवून रेवंत यांनी तेलंगणामध्ये ‘प्रजाला’ सरकारचा संदेश दिला आहे.
राज्यातील काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर, आज रेवंत रेड्डी यांचा शपथविधी सोहळा एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व्यासपीठावर उपस्थित होते.
रेवंत रेड्डी बनले तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री -
तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी रेवंत रेड्डी आणि इतर मंत्र्यांना शपथ दिली. महत्वाचे म्हणजे रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित होण्यापूर्वी, तेलंगणामध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत माजी तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष एन. उत्तम कुमार रेड्डी, माजी सीएलपी नेते भट्टी विक्रमार्क, माजी मंत्री कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह सारख्या नावांचीही चर्चा होती. आज रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत. साधारणपणे एक दशकापूर्वी तेलंगणा नावाने नवे राज्य अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत तेथे भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) मुख्यमंत्री होते.
तेलंगणात काँग्रेसने किती जागा जिंकल्या? -
काँग्रेस हायकमांडने मंगळवारी रेवंत रेड्डी यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव करत एकूण 119 जागांपैकी 64 जागा जिंकल्या. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला 39 जागांवरच समाधान मानावे लागले.