केरळमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पक्षाचे दिग्गज नेते के. मुरलीधरन (K. Muralidharan) यांना वायकोम सत्याग्रहावर बोलण्याची संधी न दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेसंदर्भात काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरूर यांनी, हे वरिष्ठ नेत्यांसाठी अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
थरूर म्हणाले, जर काँग्रेसला योग्य पद्धतीने पुढे वाटचाल करायची असेल, तर वरिष्ठ नेत्यांसोबत अशा पद्धतीचा व्यवहार योग्य नाही. काँग्रेस खासदार थरूर म्हणाले, मुरलीधरन हे वरिष्ठ नेते आहेत. ते केपीसीसीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. अशा वरिष्ठ व्यक्तीचा अपमान योग्य नाही.
शशी थरूर यांच्या वक्तव्याने वाद वाढला! - काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचे पुत्र मुरलीधरन यांनी कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त केली. के. मुरलीधरन म्हणाले, त्यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले. रमेश चेन्नीथला आणि एम. एम. हासन या दोन केपीसीसीच्या माजी अध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांना संधी दिली गेली नाही. यानंतर या प्रकरणावर थरूर यांनी भाष्य केले आहे.
मुरलीधरन म्हणाले ही मोठी गोष्ट आहे -याशिवाय, आपले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि केपीसीसीचे अध्यक्ष के. सुधाकरन यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आहे. जर पक्षाला आपल्या सेवेची गरज नसेल, तर ते सांगू शकतात, असेही आपण त्यांना सांगितल्याचे मुरलीधरन यांनी म्हटले आहे.
मुरलीधरन यांना का दिली नाही संधी? -यातच, चेन्नीथला म्हणाले, या गोष्टीचा मुद्दा बनविण्याची आवश्यकता नाही. कारण पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना तातडीने जायचे असल्याने के. मुरलीधरन यांना संधी मिळाली नसावी.