नवी दिल्ली - भारतीय रेल्वे बोर्डाने रेल्वे स्थानके व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एक धोरण लागू केले असून, त्याचा भाग म्हणून देशातील सर्व म्हणजे ८५00 रेल्वे स्थानकांवर लवकरच टॉयलेट्स बांधण्यात येणार ंआहेत. हे धोरण राबवण्यासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी मिळवण्याचे रेल्वेने ठरविले आहे.रेल्वे स्थानकांतील टॉयलेट्स अतिशय अस्वच्छ असतात. ती नियमितपणे स्वच्छ केली जात नाहीत. तसेच रेल्वे मार्गाच्या बाजूलाच आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक शौचास जातात. त्यामुळे तो परिसरही घाणीने माखलेला असतो आणि तिथे दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे आजारही उद्भवण्याची शक्यता असते. हे सारे टाळण्यासाठी रेल्वेने नवे धोरण तयार करून, ते लगेचच राबवण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व स्थानकांवर स्त्रिया, पुरुष व दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. ती भारतीय तसेच पाश्चात्य अशी दोन्ही प्रकारची असतील. ती कायम स्वच्छ ठेवण्यासाठी दोन कर्मचारी व त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक असेल. स्वयंसेवी संस्थामार्फत हे कर्मचारी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच टॉयलेटमध्ये २४ तास पुरेल एवढे पाणी असेल, याची दक्षता घेतली जाईल. रेल्वे बोर्डानेच ही माहिती दिली आहे.नॅपकिन्स, गर्भनिरोधकांचीही विक्रीयाशिवाय रेल्वे स्थानकांवर व स्थानकांबाहेर सॅनटरी नॅपकिन व पुरुषांची गर्भनिरोधके विकत मिळू शकतील.रेल्वे प्रवाशांनाच नव्हे, तर आसपासच्या लोकांनाही ती विकत मिळावीत, या उद्देशाने स्थानकांबाहेर ती विकण्यात येतील. त्यासाठी तिथे लहान आकाराचे किआॅस्क उभारण्यात येणार आहेत. त्यात पैसे टाकले की नॅपकिन वा गर्भनिरोधक मिळू शकेल. कमी किमतीचे सॅनिटरी नॅपकिन तिथे असतील.लोकांमध्ये कुटंब कल्याण व आरोग्याची काळजी आणि त्यासाठी या वस्तुचा वापर याची जागृतीही पोस्टर्सद्वारे करण्यात येणार आहे. वापरण्यात आलेल्या वस्तू फेकण्यासाठीही तिथे व्यवस्था केली जाईल.
८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:51 AM