गुरुग्राम - प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. हत्या प्रकरणी सीबीआयने रायन इंटरनॅशन स्कूलच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून, तो वारंवार आपली जबाब बदलत आहेत. दोन दिवसांपुर्वी अल्पवयीन न्याय मंडळाने सांगितलं होतं की, अकरावीत शिकणा-या आरोपी विद्यार्थ्याने प्रद्युम्नची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. कशाप्रकारे प्रद्युम्नची हत्या करण्यात आली हेदेखील सांगण्यात आलं होतं. पण आता विद्यार्थ्याने आपला जबाब पलटला आहे. आपल्या जाणुनुजून फसवलं जात असून, आपण कोणाचीही हत्या केलेली नाही असं विद्यार्थ्याने बाल संरक्षण अधिका-याला (सीपीओ) सांगितलं आहे.
अल्पवयीन आरोपीच्या पित्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, सीबीआय आपल्या मुलाला फसवत असल्याचा आरोप केला आहेत. जो गुन्हा त्याने केलाच नाही, तो कबूल केला जावा यासाठी आपल्या मुलाचा छळ केला जात असल्याचंही ते बोलले आहेत. गुन्हा कबूल न केल्यास आपल्या संपुर्ण कुटुंबाला गोळ्या घालून ठार करण्याचा धमकी सीबीआय अधिका-यांनी दिली होती असा दावा त्यांनी केला आहे. सीबीआयच्या धमकीनंतरच आपल्या मुलाने गुन्हा कबूल केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याने सोमवारी बाल संरक्षण अधिका-यासमोर हत्या न केल्याचं सांगितलं आहे. बाल संरक्षण अधिका-याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, 'विद्यार्थी शांत दिसत होता. मी त्याला सांगितलं की मी सीपीओ आहे, त्यामुळे न घाबरता जे काही हे ते सांग. तेव्हा विद्यार्थ्याने आपण हत्या केली नसून, मुद्दामून फसवलं जात असल्याचं सांगितलं'.
विद्यार्थ्याने आपले वडिल आणि तपास अधिका-यांसमोर गुन्हा कबूल केला असल्याचं सीबीआयने 8 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सांगितलं होतं. आपण घाबरल्यामुळे गुन्हा कबूल केल्याचं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे असं सीपीओने सांगितलं आहे. सीपीओने सांगितलं की, 'तपास अधिका-यांनी त्याला मारहाण केली होती. त्याचा छळ करण्यात आला. सीबीआयने तपासादरम्यान अल्पवयीन न्याय मंडळाच्या एकाही सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगी दिली नव्हती. ही प्रक्रिया आहे का याबद्दल मला माहित नाही'.
सीबीआय प्रवक्त्याने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सीबीआय प्रवक्त्याने नाव जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, 'सीबीआय अशा प्रकारचे हतकंडे वापरत नाही. आरोपी विद्यार्थ्याने वडिल आणि वेलफेअर अधिका-यासमोर आपला गुन्हा कबूल केला होता'.
सीबीआयने तपास सुरु केला असता चौकशीदरम्यान आरोपी विद्यार्थ्याने परिक्षेचा तणाव आणि पॅरेंट्स मीटिंग टाळण्यासाठी प्रद्युम्नची गळा कापून हत्या केल्याचं समोर आलं होतं. आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखतही नव्हता असं तपासातून समोर आल्याचं सांगण्यात आलं होतं. पण जसजसा तपास आणि चौकशीचा वेग वाढत आहे, त्यानुसार काही नवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. सीबीआयच्या नव्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होते. त्यानेच प्रद्युम्नला बाथरुममध्ये नेलं होतं, आणि नंतर हत्या केली.
सीबीआयच्या थिअरीनुसार, प्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी एकत्र पियानो क्लासमध्ये जात होते. यामुळेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. पण हीच ओळख प्रद्युम्नच्या जीवावर बेतली. प्रद्युम्न गेल्या दोन वर्षांपासून पियानो क्लासला जात असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. शनिवारी समुपदेशनादरम्यान आरोपी विद्यार्थ्याने अल्पवयीन न्याय मंडळाला सांगितलं की, 8 सप्टेंबरच्या सकाळी शाळेत पोहोचल्यानंतर आपलं दप्तर वर्गात ठेवलं आणि बाजारातून खरेदी केलेला चाकू घेऊन तळमजल्यावर गेलो. प्रद्युम्नचा गळा कापल्यानंतर त्याने रक्ताची उलटी केली आणि चाकूवरच पडला. ज्यामुळे त्याला गंभीर इजा झाली.
आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखत असल्याने मदतीच्या बहाण्याने त्याला बाथरुममध्ये घेऊन गेला आणि गळा कापून हत्या केली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याने सांगितलं की, प्रद्युम्नच्या पाठीवर दप्तर असल्याचा फायदा त्याला मिळाला. दप्तरामुळे रक्ताचे कोणतेही डाग त्याच्या कपड्यावर पडले नाहीत. यानंतर त्याने चाकू तिथेच ठेवला आणि बाहेर पळत जाऊन माळी आणि शिक्षकांना माहिती दिली. याशिवाय, आरोपीने हेदेखील कबूल केलं आहे की, आपल्याला परिक्षेची भीती वाटत होती आणि कोणत्याही परिस्थितीत ती टाळायची होती.