नवी दिल्ली - माजी आयएसएस अधिकारी पूजा खेडकरनं तिच्यावर होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्ली हायकोर्टात पूजा खेडकरनं तिचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. माझी उमेदवारी अयोग्य ठरवण्याची कुठलीही शक्ती यूपीएससीला नाही. एकदा प्रशिक्षित अधिकारी म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर उमेदवाराला अपात्र घोषित करण्याचा अधिकार UPSC ला नाही असं पूजा खेडकरनं हायकोर्टात म्हटलं आहे.
पूजा खेडकरनं कोर्टात सांगितले की, माझ्याविरोधात केंद्र सरकारचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) कारवाई करू शकतो. २०१२-२२ पर्यंत माझ्या नावात किंवा आडनावात कुठलाही बदल झाला नाही आणि मी यूपीएससीला चुकीची माहिती दिली नाही. यूपीएससीने बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख पटवली आहे. आयोगाला माझी कागदपत्रे बनावट आणि बोगस आढळली नाहीत. माझे शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मतारीख आणि वैयक्तिक माहितीसह इतर सर्व तपशील तपशीलवार अर्जात (DAF) सुसंगत आहेत असं तिने कोर्टाला सांगितले.
तसेच UPSC ने २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे (सायबर आणि फिंगरप्रिंट) माझी ओळख सत्यापित केली आहे. त्यानंतर २६ मे २०२२ रोजी झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीतही आयोगाने सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. मी माझ्या नावातील आणि प्रमाणपत्रांमधील विसंगती दुरुस्त करण्यासाठी शपथपत्रे आणि अधिकृत राजपत्रे देखील सादर केली आणि PWBD (मानदंड अपंगत्व असलेली व्यक्ती), जात आणि वडिलांचे नाव घोषित करण्यासाठी UPSC च्या विनंतीचे पालन केले. त्यामुळे माझे नाव चुकीचे म्हणून दिले असं आयोगाचं म्हणणे चुकीचे आहे असा दावा पूजा खेडकरने केला आहे.
दरम्यान, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडूनही (DoPT) सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली आहे. डिओपिटीनुसार एम्सद्वारे स्थापित मेडिकल बोर्डाने माझी मेडिकल चाचणी केली आहे. मेडिकल बोर्डाने माझी दिव्यांगता ४७ टक्के असून PwBD श्रेणीसाठी आवश्यक ४०% अपंगत्वापेक्षा खूप जास्त असल्याचे आढळले. माझ्याकडून UPSC कडे सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत ते सक्षम अधिकाऱ्यांकडून जारी केलेले आहेत. मी यूपीएससीला चुकीची माहिती दिली नाही किंवा फसवणूक केली नाही जसा दिल्ली क्राईम ब्रँचने माझ्यावर १९ जुलै २०२४ रोजी एफआयआरमध्ये आरोप लावले आहेत असं पूजा खेडकरनं कोर्टात सांगितले.