लोकमत न्यूज नेटवर्क : संपूर्ण जगाला विळखा घालून बसलेल्या कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट धुमाकूळ घालत असताना आता लाँग कोव्हिडचा सामना करत असलेल्या रुग्णांवरील परिणामांसंदर्भातील नवे संशोधन समोर आले आहे. यात कोरोनोत्तर अनेक व्याधी मागे लागल्याचे निदर्शनास आले आहे.
लाँग कोविडची लक्षणे ३५ आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. ही लक्षणे दिसण्याचे प्रमाण ९१.८ टक्के एवढे आहे. संशोधनात ३७६२ रुग्ण सहभागी झाले होते. त्यापैकी ९६ टक्के रुग्णांमध्ये ९० दिवसांनी लाँग कोविडची लक्षणे सुरू झाल्याची नोंद आहे. ६५ टक्के रुग्णांमध्ये कोरोना झाल्यानंतर ६ महिन्यांनी लाँग कोव्हिडची लक्षणे आढळून आली. लाँग कोविडला वैद्यकीय परिभाषा नाही. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास कोरोनाची बाधा होऊन गेल्यानंतर त्या विषाणूची कोणती ना कोणती तरी लक्षणे दीर्घकाळपर्यंत शरीरावर दिसणे म्हणजे लाँग कोविड. कोरोना होऊन गेल्यानंतरही अनेक रुग्णांना अनेक महिने शारीरिक त्रास जाणवला.
संशोधन कोणी केले?
- लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमधील टीमने लाँग कोविडसंदर्भातील संशोधन केले.
- कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांवर त्यांनी सात महिने लक्ष ठेवले.
- त्यात कोरोनोत्तर आढळून येणाऱ्या २०३ पैकी ६६ लक्षणांवर बारिक लक्ष ठेवण्यात आले.
- सर्व रुग्ण १८ वर्षांहून जास्त वयाचे होते.
- या सर्व रुग्णांना कोरोनाशी संबंधित २५७ प्रश्न विचारण्यात आले.
लाँग कोविडची लक्षणे
- अंधुक दिसणे
- वारंवार स्मृतिभ्रंश होणे
- खाज सुटणे
- हात व पायांना कंप सुटणे
- मासिक पाळीत बदल होणे
- अतिसार
- कानात आवाज घुमणे
- लाँग कोव्हिडची एकंदर २०० लक्षणे आहेत. - ती किती काळपर्यंत टिकतील, याचे नेमके उत्तर अद्याप सापडलेले नाही.
- मात्र, पुरेसा आराम, भरपूर झोप, फळांचे सेवन आणि सात्विक आहार यावर भर देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.