लंडन : ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा कोरोना विषाणू त्याच्या आधीच्या प्रकारांपेक्षा ३० ते १०० टक्के इतक्या प्रमाणात अतिशय घातक आहे. यासंदर्भातील एका पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याच विषाणूने गेल्या वर्षीपासून ब्रिटनमध्ये हाहाकार माजविला आहे. या विषयावर ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूला बी. १.१.७ असेही म्हटले जाते. या विषाणूचा संसर्ग झालेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे.
हा नव्या प्रकारचा विषाणू व कोरोनाचे इतर प्रकारचे विषाणू यांनी बाधित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करून एक्सेटर व ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या विषाणूची बाधा झालेल्या ५४,९०६ रुग्णांपैकी २२७ जणांचा मृत्यू झाला. तर इतर प्रकारच्या कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या ५४९०६ रुग्णांमध्ये १४१ जणांचा बळी गेला. त्यावरून नव्या प्रकारचा कोरोना विषाणू अधिक घातक आहे हे स्पष्ट होते.
६ राज्यांत ८५% रुग्ण n महाराष्ट्रासहीत सहा राज्यांमध्ये कोरोनाचे ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. त्यामध्ये केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. मात्र केरळमध्ये गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या घटली तर महाराष्ट्रामध्ये ती वाढली आहे.
जगात २६ लाखांहून अधिक बळीn जगभरात ११ कोटी ८६ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ९ कोटी ४२ लाख जण बरे झाले. तसेच २ कोटी १७ लाख उपचाराधीन रुग्ण असून २६ लाख ३३ हजार जणांचा बळी गेला. n अमेरिकेत २ कोटी ९८ लाखांहून रुग्ण आहेत. त्यापैकी २ कोटी ६ लाख लोक बरे झाले व ५ लाख ४२ हजार जणांचा बळी गेला. भारतामध्ये कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. ब्राझीलमध्ये १ कोटी १२ लाख रुग्ण असून बळींची संख्या २ लाख ७० हजार आहे.