नवी दिल्ली : ‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल’ (पीएसएलव्ही)-३७ या सिद्धहस्त अग्निबाणाच्या एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये एकाच वेळी यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) बुधवारी नवे यशोशिखर गाठत भारताची मान आणखी ताठ केली.आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी वेळी ‘पीएसेलव्ही-३७’ अग्निबाणाने या १०४ उपग्रहांना कवेत घेऊन अचूक उड्डाण केले. द्रवरूप आणि घन इंधनांच्या चार इंजिनांच्या रेट्याने पुढील अवघ्या १७ मिनिटांत हा अग्निबाण अंतराळात ५०० किमी उंचीवर पोहोचला. त्यानंतरच्या काही मिनिटांत अग्निबाणात विविध कप्प्यांमध्ये खुबीने ठेवलेल्या १०४ उपग्रहांचे त्यांच्या पूर्वनिर्धारित कक्षांमध्ये एका पाठोपाठ एक अचूकतेने प्रक्षेपण करण्यात आले. ही कामगिरी फत्ते होताच, अंतराळ तळावरील नियंत्रण कक्षात बसलेल्या ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी व तंत्रज्ञांनी हर्षोत्कट जल्लोश केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)104 उपग्रह एकूण सात देशांचे होते. त्यापैकी भारताचा ‘कार्टोस्टॅट-२’ हा उपग्रह सर्वात मोठा होता. कार्यान्वित झाल्यावर त्याचा उपयोग भारतीय भूप्रदेशाची अधिक सुस्पष्ट दूरस्थ चित्रे मिळविण्यासाठी होईल. याखेरीज दिशानिर्देशनासाठी उपयोगी पडणारे ‘आयएनएस-१ए’ व ‘आयएनएस-१बी’ हे भारताचे आणखी दोन लघुउपग्रहही (नॅनो सॅटेलाइट) अंतराळात सोडण्यात आले. इतर उपग्रहांमध्ये ९६ अमेरिकेतील दोन खासगी कंपन्यांचे आणि नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड, इस्राएल, कझागस्तान व संयुक्त अरब अमिरात या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह होता.320 टन या अग्निबाणाचे स्वत:चे वजन 1378किलो वजन प्रक्षेपणासाठी सोबत नेलेल्या सर्व उपग्रहांचे 37उपग्रह रशियाने सन २०१४ मध्ये अशा प्रकारे एकाच अग्निबाणाने एकाच वेळी सोडले होते. 20 उपग्रह ‘इस्रो’ने याआधी एकदम सोडले होते. आजची संख्या याहून पाचपटीने अधिक होती.प्रक्षेपण खर्च कमी अंतराळात उपग्रह सोडणे हे जगात वेगाने वाढणारे व्यावसायिक क्षेत्र आहे. विश्वासार्ह तांत्रिक क्षमता व स्पर्धात्मक खर्च हे या व्यवसायातील यशाचे गमक आहे. एका अग्निबाणाने जेवढे जास्त उपग्रह सोडले जातील, तेवढा प्रत्येक उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा खर्च कमी असे हे गणित आहे. म्हणूनच ‘इस्रो’चे यश लक्षणीय आहे. सर्वात यशस्वी अग्निबाणबुधवारच्या प्रक्षेपणासाठी वापरला गेलेला ‘पीएसएलव्ही-३७’ हा ‘इस्रो’चा टप्प्याटप्प्याने उन्नत केलेला सर्वात यशस्वी असा अग्निबाण आहे. या जातकुळीच्या अग्निबाणाचे हे १५ वे उड्डाण होते. सन २००८ मध्ये भारताचे पहिले चांद्रयान पाठविण्यासाठी त्याचा सर्वप्रथम वापर केला व तेव्हापासून त्याने प्रत्येक वेळी १०० टक्के यश संपादन केले आहे.असे सोडले उपग्रहअग्निबाणाने ठरलेली उंची गाठताच सकाळी ९.४५ वाजता भारताचे तीन उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित केले गेले. त्यानंतर, काही सेकंदांच्या अंतराने इतर उपग्रह त्यांच्या कक्षांमध्ये पाठोपाठ सोडण्यात आले.एकाच वेळी एवढे उपग्रह सोडण्यासाठी पुरेसा शक्तिशाली अग्निबाण विकसित करण्याचे तंत्र ‘इस्रो’ने या आधीच आत्मसात केले होते. अग्निबाणाच्या पुढील टोकाकडील चिंचोळ््या मर्यादित जागेत स्वतंत्र कप्पे तयार करून त्यात एवढे उपग्रह ठेवणे आणि योग्य वेळी हे कप्पे उघडून एकेक उपग्रह क्रमाने प्रक्षेपणासाठी बाहेर सोडणे यासाठी अतिप्रगत अभियांत्रिकी कौशल्याची गरज होती. ते ‘इस्रो’ने यशस्वीपणे आत्मसात केल्याची पोचपावती बुधवारच्या या कामगिरीने मिळाली.
‘इस्रो’ने गाठले नवे यशोशिखर
By admin | Published: February 16, 2017 12:52 AM