बँक चेकच्या व्यवहारांना सुरक्षा
१ जानेवारीपासून चेकने पैसे देण्याच्या नियमात बदल होणार आहे. ५० हजार रुपयांहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पेमेंट सीस्टिम लागू होईल. अशा चेकसाठी दोनदा खात्री करून घेतली जाईल.
‘सरल जीवन विमा’ सुविधा सर्वानाच
विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इर्डा) सर्व विमा कंपन्यांना १ जानेवारीपासून ‘सरल जीवन विमा’ विकण्याचे निर्देश दिले आहेत. यात कमाल २५ लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच असेल.
यूपीआय पेमेंट होणार सुरक्षित
एनपीसीआयने थर्ड पार्टी ॲपच्या यूपीआय पेमेंट सर्व्हिसवर ३० टक्क्यांपर्यंत मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला. या नियमामुळे गूगल पे, ॲमेझॉन पे, फोन पे यांसारख्या ॲप ग्राहकांवर परिणाम होईल.
सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य
टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा १ जानेवारीपासून हळूहळू कमी होऊ लागतील. कारण नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून वाहनधारकांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे.
म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत बदल
गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूक नियमांत बदल केले. यानुसार फंड्सचा ७५ टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणे अनिवार्य असेल. सद्य:स्थितीत हे प्रमाण ६५ टक्के आहे.
कॉल करताना आधी शून्य लावा
१ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यास आधी शून्य दाबावा लागेल आणि त्यानंतर मोबाइल नंबर. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्याची मुभा मिळेल.
वर्षभरात ४ वेळाच जीएसटी रिटर्न्स
व्यावसायिकांना सद्य:स्थितीत वर्षाला १२ जीएसटीआर-३बी फॉर्म्स भरावे लागतात. मात्र, १ जानेवारीपासून वर्षभरात केवळ ४ वेळाच हे फॉर्म्स भरावे लागतील. प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी हा निर्णय झाला.
कॉन्टॅक्टलेस कार्डचा फायदा
डिजिटल पेमेंट पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काँटॅक्टलेस कार्डाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पेमेंट मर्यादेत ५ हजारांपर्यंत वाढ केली. सद्य:स्थितीत ही मर्यादा २ हजार एवढीच आहे.
यंदा कारखरेदी होईल महागडी
यंदा कार घेणाऱ्यांना खिशाला थोडा जास्त खार लावावा लागेल. कारण अनेक वाहननिर्मात्या कंपन्या किमती वाढविण्याच्या तयारीत आहेत. २०२०मधील कसर भरून काढण्यासाठी किमती वाढविण्यात येतील.
सिलिंडरच्या किमतीत बदल
सरकारी तेल कंपन्या महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करत असतात. यंदा त्यात वाढ होऊ शकते. १ जानेवारीपासूनच सिलिंडरच्या किमती वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.