नवी दिल्ली- नव वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रशासन पाच मोठी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. 2019मध्ये तुम्हाला प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच रेल्वेमध्ये आपल्याला रोबोटही पाहायला मिळणार आहे. तर तृतीय पंथीयांसाठीही रेल्वे नवी सुविधेची सुरुवात करणार आहे. आज आम्ही अशाच 5 सुविधांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
- धावत्या ट्रेनमध्ये करता येणार शॉपिंग
नव्या वर्षात रेल्वेकडून शॉपिंगची विशेष सुविधा दिली जाणार आहे. आता ट्रेन प्रवासात घरगुती सामानासह अन्य सामान तुम्हाला खरेदी करता येणार आहे. पहिल्यांदा या सुविधेची सुरुवात दोन ट्रेनमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात दोन-दोन ट्रेनशी ही सुविधा जोडली जाणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या शॉपिंगच्या सुविधेसाठी खासगी कंपन्यांबरोबर 5 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. ती संबंधित कंपनी ट्रेनमध्ये घरगुती सामानासह ब्यूटी प्रोडक्टसह इतर वस्तूही विक्रीसाठी ठेवणार आहे. तसेच ही शॉपिंग तुम्हाला सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत करता येणार आहे.
- कुंभमेळ्यासाठी 800 स्पेशल ट्रेन सोडणार
2019मध्ये प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वेनं खास सुविधा पुरविण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्पेशल 800 ट्रेन चालवल्या जाणार असून, या ट्रेनमधअेय मोफत वायफाय, बायो-टॉयलेटसारखी सुविधा दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये आपल्याला बायो टॉयलेटसारखी नवी सुविधा दिली जाणार आहे.
- रेल्वेगाड्यांच्या देखभालीसाठी नवा रोबोट
नव्या वर्षात रेल्वेगाड्यांच्या देखभालीसाठी रोबोटला तैनात करण्यात येणार आहे. रेल्वेच्या नागपूरमधल्या अभियंता विभागात एक रोबोट तयार केला गेला आहे. या रोबोटला उस्ताद असं नाव देण्यात आलं आहे. हा रोबोट ट्रेनच्या खालील भागातील पार्टचे फोटो काढणार आहे. तसेच त्या पार्टमध्ये कोणीही तांत्रिक खराबी असल्यास त्यावर नोटीसही चिकटवली जाणार आहे. उस्ताद रोबोटमध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे 320 डिग्रीच्या कोणातून व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यात सक्षम आहेत.
- फाइव्ह स्टार हॉटेलसारखं रेल्वे स्टेशन
या वर्षी देशातील पहिल्या फाइव्ह स्टार रेल्वे स्टेशनची सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे रेल्वे स्टेशन गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये आहे. हे देशातलं पहिलं असं रेल्वे स्टेशन असेल जे फाइव्ह स्टार हॉटेलसारखं डेव्हलप केलं जाईल. या हॉटेलमध्ये 10 मजले असून, 300 खोल्या असणार आहेत.
- तृतीय पंथीयांना मिळणार सवलत
रेल्वेच्या नव्या सुविधेनुसार तृतीय पंथीयांना ज्येष्ठ नागरिकांमध्ये रेल्वे तिकिटात सवलत मिळणार आहे. तृतीय पंथीयांना ही सुविधा 1 जानेवारी 2019मध्ये मिळण्यास सुरुवात होणार आहे.