हैदराबाद : आंध्र प्रदेशातील धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणा-या देणगी, दाननिधी विभागाने नव्या वर्षाच्या उत्सवावर सरसकट बंदी घातली आहे. आंध्र प्रदेश सरकारने तशा आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे. नव्या वर्षानिमित्त होणाºया उत्सवाचे आयोजन हिंदू आणि तेलुगु परंपरेप्रमाणे नसल्याचे सरकारने या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.त्यामुळे राज्यातील कोणत्याही मंदिरांमध्ये नववर्षाच्या निमित्ताने विद्युत रोशणाई करू नये आणि फुलांवरही अव्वाच्या सव्वा खर्च करू नये, असे सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनांना सांगितले आहे. सुट्या तसेच नववर्षाच्या दिवशी नेहमीच सर्वत्र मंदिरात देवदर्शनासाठी जाणाºया भाविकांची संख्याही प्रचंड असते. मात्र त्यानिमित्ताने मंदिरांत उत्सवी वातावरण निर्माण करू नये, असे आंध्र प्रदेश सरकारने सर्व देवस्थानांना कळवले आहे.या सरकारी आदेशात म्हटले आहे की, तेलुगु नवीन वर्ष चैत्र मासात ‘उगडी’ नावाने ओळखले जाते. तो उत्सव स्वरूपात साजरा करण्यास हरकत नाही. मात्र मंदिर व्यवस्थापन आणि पुजाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत की, नववर्षाच्या निमित्ताने फुलांची सजावट, बॅनर आणि विशेष व्यवस्था करण्यासाठी पैसे खर्च करू नयेत. (वृत्तसंस्था)आपलेच कॅलेंडर पाळातिरुमला तिरुपती देवस्थानशिवाय राज्यातील इतर मंदिरांच्या प्रशासकीय बाबींवर हिंदू धर्म परीरक्षण ट्रस्टचे नियंत्रण आहे. या ट्रस्टचे सचिव सी. व्ही. राघवचारीयालु यांनी सांगितले की, यापूर्वी नवीन वर्षानिमित्त होणाºया कार्यक्रमात फुलांची सजावट आणि बॅनरवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. हिंदू आणि तेलुगु परंपरेनुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करणे उचित नाही. असे प्रकार आता थांबायला हवेत. आम्ही हिंदू कॅलेंडरऐवजी सर्रास इंग्रजी कॅलेंडरनुसार अनुसरण करत आहोत. हे चुकीचे आहे.
मंदिरांमध्ये नववर्षाच्या उत्सवावर बंदी, आंध्र प्रदेशचा निर्णय, हिंदू-तेलुगु परंपरेत प्रथा नसल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:07 AM