नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी भारतात येऊन काही ठिकाणांची रेकी करून गेला होता, अशी माहिती आता उघडकीस आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून याबाबतचा एक अहवाल जारी करण्यात आला. त्यात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागात असलेल्या मशिदीवर १५ मार्च २०१९ मध्ये ब्रेंटन टॅरेंट नामक दहशतवाद्याने अंदाधूंद गोळीबार केला होता. यात ५१ जणांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यानंतर न्यूझीलँडच्या संरक्षण संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करण्यापूर्वी या दहशतवाद्याने जगातील अनेक भागांचा दौरा केला होता. यामध्ये भारतातीलही काही शहरांचा समावेश होता. न्यूझीलँडच्या संरक्षण संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला. सन २०१५-१६ या कालावधीत तो दहशतवादी भारतात आला होता. भारतातील मुंबई, जयपूर आणि गोवा या तीन ठिकाणी त्याने वास्तव्य केले होते. सर्वाधिक वास्तव्य त्याने गोव्यात केले होते, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
न्यूझीलँडमधील तपास यंत्रणांनुसार, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि भारतासह अनेक देशांमध्ये ब्रेंटन टॅरेंट फिरून आला होता. एवढेच नव्हे, तर संपूर्ण न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही त्याने केला होता. मार्च २०१९ मध्ये मशिदीवर हल्ला करण्यापूर्वी त्याने मुस्लिम समाजाविरोधात अनेक पोस्ट फेसबुकवर शेअर केल्या होत्या, असेही तपासात उघड झाले असल्याचे समजते.