नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नवजात बाळाला सिमेंटच्या रिकाम्या असलेल्या तीन पिशव्यांमध्ये भरून फेकून देण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. मात्र झुडुपांमधून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी या बाळाचा जीव वाचवला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे चादर आणि सिमेंटच्या तीन पिशव्यांमध्ये या नवजात बाळाला गुंडाळलं होतं. मात्र असं असतानाही ते बाळ जिवंत राहिलं आहे. म्हणूनच देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा येथे प्रत्यय आला आहे. बाळाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या परतापूर क्षेत्रातील शताब्दीनगर सेक्टर चारमध्ये ही घटना आहे. लोकांना झुडुपांमधून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला.
बाळाला पाहून सर्वांना धक्काच बसला
मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून गर्दी जमा झाली होती. पिशवीतून रडण्याचा आवाज ऐकू येत असावा असा अंदाज लोकांनी व्यक्त केला आणि त्यानंतर झुडुपांमधून बाहेर काढली आणि ती उघडली. पिशवीमध्ये आणखी एक पिशवी बांधलेली आढळली. ती पिशवी उघडल्यानंतर आणखी एक पिशवी आत आढळली. तिसऱ्या पिशवीच्या आतमध्ये एका चादरीत नवजात बाळ असलेलं पाहायला मिळालं. बाळाला पाहून सर्वांना धक्काच बसला.
पोलीस या प्रकरणाचा करताहेत अधिक तपास
लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर नवजात बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी हे बाळ प्री-मॅच्युअर असल्याचं सांगितलं आहे. तसेच नाळ देखील कापली गेलेली नव्हती. या बाळाचा जन्म काही वेळापूर्वीच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.