बरेली (उत्तर प्रदेश) - देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात आला. येथे स्मशानातील तीन फूट खोल खड्ड्यात हंड्यात पुरलेल्या अवस्थेत एक नवजात बालिका जिवंत सापडली होती. या मुलीची प्रकृती अद्याप गंभीर असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हंड्यात भरून जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सुमारे 48 तास या मुलीने ज्या प्रकारे मृत्यूशी झुंज दिली ते पाहून तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मृत्यूवर मात करणाऱ्या या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ही मुलगी जमिनीखाली पुरलेल्या अवस्थेत सुमारे 48 तास जिवंत राहिली. त्यामुळे तिच्या शरीरातील ब्राऊन फॅट कमी झाले आहे. ब्राऊन फॅट किंवा ब्राऊन एडिपोझ टिश्शू शरीरातील फॅटी अॅसिड आणि ग्लुकोज वापरून लहान बालकांना थंड वातावरणात जिवंत राहण्यास मदत करतात.''जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडलेली बालिका ही गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आलेली असून, तिचा प्लेटलेट्स काऊंट सरासरी 1.5 लाखांवरून घसरून केवळ 10 हजार इतका राहिला आहे. मात्र असे असले तरी ही बालिका जिवंत राहण्याचे संकेत मिळत आहेत. फॅट कमी झाल्याने कमी झालेले या बालिकेच्या शरीराचे तापमान सामान्य पातळीवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दरम्यान, ही नवजात बालिका उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणेचे संकेत मिळत आहेत. दरम्यान या बालिकेला आम्ही ट्युबच्या माध्यमातून अन्नपुरवठा करत आहोत, अशी माहिती तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान, भाजपा आमदार राजेश मिश्रा यांनी या मुलीच्या उपचारांचा आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जमिनीखाली सापडल्याने लोकांनी या मुलीचे सीता असे नामकरण केले आहे. दुसरीकडे या बालिकेला क्रूरपणे जमिनीत पुरून जाणाऱ्या माता-पित्याचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या गुरुवारीत बरेशी शहरातील एक कुटुंब आपल्या घरातील मृत बालिकेचा अंत्यविधी करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले असताना स्मशानातील खड्ड्यात ही बालिका हंड्यात पुरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर या कुटुंबाने या मुलीचा स्वीकार करत तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते.
मृत मुलीला दफन करण्यासाठी गेलेल्या पित्याला स्मशानातील खड्ड्यात सापडले अनमोल रत्न...