गोपाळगंज – बिहारमध्ये सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे, एकीकडे पुराचा कहर तर दुसरीकडे कोरोनाची महामारी. ही परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुशासनचा दावा करणाऱ्या नितीश सरकारची पोलखोल गोपाळगंजमधील पूलाचा काही भाग कोसळल्याने उघड झाला आहे. एक महिन्यापूर्वी सत्तरघाट महासेतूचं उद्धाटन करण्यात आलं होतं. यासाठी जवळपास २६४ कोटींचा खर्च झाला होता.
१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया याठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हा पूल गोपाळगंजला चंपारणपासून तिरहुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडतो. गोपाळगंज येथे बुधवारी ३ लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले. अतिवेगात आलेल्या पाण्यामुळे पूलाचा काही भाग कोसळला.
बैकुंठपूरच्या फैजुल्लाहपूर येथे हा पूल तुटला आहे. भाजपा आमदार मिथिलेश तिवारी यांनी या घटनेची माहिती बिहारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे. या पूलाचं बांधकाम ब्रीज निर्माण विभागाकडून करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये या पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती त्यानंतर संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन १६ जून २०२० मध्ये या महासेतू पूलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं होतं.
या घटनेनंतर आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन बिहार सरकारवर टीका केली आहे. ८ वर्षात २६३.४७ कोटी खर्च करुन गोपाळगंजच्या सत्तर घाट पूलाचं बांधकाम केले होते, १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याचे उद्धाटन केले होते. फक्त २९ दिवसांत हा पूल कोसळला आहे. खबरदार, जर कोणी नितीश कुमार यांना भ्रष्टाचारी म्हटलं तर...२६३ कोटी सुशासनाचा दिखावा आहे इतक्या पैशात त्यांचे उंदिर दारू पितात असा टोला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना लगावला आहे.
तर याबाबत बिहारमधील मंत्री नंदकिशोर यादव म्हणाले की, सत्तरघाट येथे ३ छोटे पूल आहेत, सत्तरघाट ब्रिजपासून २ किमी अंतरावर असणारा छोटा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटला आहे. संपूर्ण सत्तरघाट पूलाचं नुकसान झालं नाही. अशा नैसर्गिक परिस्थितीत रस्ते वाहून जातात, पूल तुटतात अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले आहे.