रांची - सरकारी रुग्णालय म्हटलं की नको रे बाबा. कारण, सुविधांचा अभाव आणि तेथील कर्मचाऱ्यांचा बडेजावमुळे सर्वसामान्य नागरिक सरकारी रुग्णालयापासून दूरच राहतो. सरकारी प्रशासन व्यवस्थेबद्दलची अनास्थाही यास कारणीभूत आहे. त्यामुळे, पर्याय नसेल तरच सरकारी रुग्णालयात उपचार नागरिकांकडून घेतले जातात. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय नागरिकही सरकारी रुग्णालयात जाणे टाळतो. मात्र, चक्क एका आयएएस अधिकारी महिलेने चक्क प्रसुतीसाठी सरकारी रुग्णालयाची निवड केली.
नायक चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनल्यानंतर चक्क रिक्षाने कार्यालयात पोहोचतो, त्यावेळी त्याचा पीए असलेला अभिनेता परेश रावल म्हणतो की, यहाँ तो छोटा मोठा भी इनोव्हा मे आता है, और ये सीए ऑटो मे.... अगदी असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. कारण, आदिवासीबहुल झारखंड राज्यातील गोड्डा येथे सेवा बजावत असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याने आपली प्रसुती चक्क सरकारी रुग्णालयात केली. जिथं नगरपालिकेतील साधा कर्मचारीही पाय ठेवायला नको म्हणतो, तिथं चक्क महापालिकेच्या उपायुक्तांनीच सरकारी रुग्णालयात जाणे पसंत केले, तेही स्वत:च्या प्रसुतीसाठी.
गोड्डा येथील उपायुक्त किरण कुमारी पासी यांनी सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. किरण कुमारी यांनी आपली प्रसुती सरकारी रुग्णालयातच करण्याची निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे सिजेरियन ऑपरेशन असतानाही, त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. किरण कुमारी यांनी गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ आणि त्याची आई दोन्हींची प्रकृती उत्तम आहे. रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांनीही जिल्हाधिकारी मॅडमच्या या निर्णयाचे कौतुक केले. तसेच, किरण कुमारी यांनी समाजाला एक सकारात्म दिशा दिली आहे. जिथे साधारण व्यक्तीही सर्दी-खोकल्याच्या आजारासाठी खासगी आणि मोठ्या रुग्णालयात जातात, तिथं जिल्हाधिकारी मॅडमच्या या निर्णयामुळे मोठा सकारात्म बदल होईल, असेही त्यांनी म्हटले. सरकारी अधिकाऱ्यांनी किरण यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे. तसेच, देवधर जिल्ह्याच्या कलेक्टर नैंसी सहाय यांनीही किरण कुमार यांचं कौतुक केलंय.