श्रीनगर : काश्मीरमधील दोन वृत्तपत्रांच्या जाहिराती राज्य प्रशासनाने कोणतेही कारण न देता बंद केल्याने त्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व प्रमुख उर्दू व इंग्रजी वृत्तपत्रांनी रविवारचा अंक पहिले पान कोरे ठेवून प्रसिद्ध केला.ग्रेटर काश्मीर, काश्मीर रिडर या दोन वृत्तपत्रांच्या सरकारी जाहिराती बंद करण्यात आल्या आहेत असा दावा काश्मीर एडिटर्स गिल्डने (केइजी) गेल्या महिन्यात केला होता. काश्मीरमधील सर्व उर्दू, इंग्रजी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर केइजीच्या संदेशाव्यतिरिक्त आणखी कोणताही मजकूर छापलेला नाही. जाहिराती नाकारलेल्या वृत्तपत्रांना त्याबाबत कळविण्याचे सौजन्य राज्य प्रशासनाने दाखविले नसल्याचा आरोपही केइजीने केला आहे. पहिले पान कोरे ठेवून रविवारचा अंक प्रसिद्ध करण्याचा निर्णय केइजी व काश्मीर एडिटर्स फोरम या दोन संघटनांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.टीकाकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न : मेहबुबा मुफ्तीजम्मू-काश्मीरमधील दोन वृत्तपत्रांच्या जाहिराती कोणतेही कारण न देता बंद करण्याच्या कृतीचा जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जाहिराती नाकारल्याने केंद्र सरकार वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांना कशी वागणूक देते हेही उघड झाले आहे. केंद्र सरकारचे गोडवे गाणाऱ्याला ते जवळ करतात. विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज सरकारकडून दडपला जातो. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही वृत्तपत्रांना जाहिराती नाकारण्याच्या सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे.
काश्मीरमधील वृत्तपत्रांनी ठेवले पहिले पान कोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 4:37 AM