नवी दिल्ली : लॉक डाऊनमुळे वृत्तपत्र उद्योगाला आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून सरकारने या उद्योगाला वेळीच साहाय्य न केल्यास हा तोटा पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत १५ हजार कोटींच्या घरात जाऊ शकतो असा इशारा इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या संस्थेने दिला आहे.आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांच्या सहीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्योगांत वृत्तपत्र उद्योग असल्याचे नमूद करून वितरण व जाहिरात या दोन्ही माध्यमांतून मिळणारा महसूल पूर्णत: खंडित झाल्याचे म्हटले आहे. नजीकच्या भविष्यातही खासगी उद्योगांकडून जाहिराती मिळण्याची शक्यता नसल्याने पुढील किमान सहा- सात महिने तोटा वाढतच जाणार आहे. केंद्राने वेळीच मदत न केल्यास हा उद्योग पूर्णत: कोलमडून पडण्याची भीती गुप्ता यांनी व्यक्त केली असून वृत्तपत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावर आकारण्यात येत असलेला ५ टक्के अबकारी कर रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या नुकसानीचा फटका वृत्तसृष्टीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कार्यरत असलेल्या ३० लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना बसलेला असल्याचे या पत्राद्वारे केंद्रीय मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.वृत्तपत्र उद्योगामुळे १० लाख लोकांना थेट रोजगार मिळतो तर अन्य १८ ते २० लाख लोक अप्रत्यक्षरित्या या व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्याच्या परिस्थितीत मासिकवेतन देण्यात तसेच विक्रेत्यांची देयके देण्यातही अनंत अडचणी येत आहेत, असेही गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. वृत्तपत्रांना पुढीलदोन वर्षे करांत सवलत दिलीजावी, शासकीय जाहिरातींच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ करावी,थकलेली सरकारी बिलेत्वरित फेडावीत तसेच वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरातींवरल्या व्ययात शंभर टक्के वाढ करावी अशामागण्याही या पत्रातून करण्यात आल्या आहेत.
CoronaVirus News: वृत्तपत्रांना आधार द्यावा, आयएनएसचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 2:52 AM