नवी दिल्ली- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं एक अनोखी भविष्यवाणी केली आहे. येत्या काही वर्षांत पाऊस आणि पुरात देशाचं अतोनात नुकसान होणार आहे. पुढच्या 10 वर्षांमध्ये पुरामुळे 16000 हजार जण जिवानिशी जातील, तर 47 हजार कोटी रुपयांचं देशाला नुकसान पोहोचेल, असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सांगितलं आहे.सरकारनं आपत्तीचा धोका टाळणे आणि त्यापासून बचाव करण्यावर पूर्ण लक्ष्य केंद्रित केलं आहे. भारताकडे अत्याधुनिक सेटलाइट प्रणाली आहे. त्याच्या माध्यमातून हवामानाचा पूर्व अंदाज लावून मृतांची संख्या कमी केली जाऊ शकते. याशिवाय आतापर्यंत सर्व प्रयत्न कागदावरच केल्याचं समोर येत आहे. जेव्हाही काही संकटं येतात, तेव्हा एनडीएमए गाइडलाइन जारी करत असते. केंद्रीय गृहमंत्रालयानं गेल्या काही दिवसांपूर्वीच देशातील 640 जिल्ह्यांतील आपत्तीचा धोक्याचा अंदाज घेतला आहे. डीआरआर अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीच्या आधारावर राष्ट्रीय स्थिरता निर्देशांक(एनआरआय) तयार करण्यात आला आहे. यामध्ये धोक्याचा अंदाज, धोका टाळण्यासाठीचे प्रयत्न यांसारख्या मापदंडांचा समावेश आहे. आपत्तीशी दोन हात करण्यासाठी होणार प्रयत्न फार तोकडे असल्याचंही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. अनेक राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनासारख्या होणा-या घटनांवर योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत. राज्यांद्वारे करण्यात आलेलं सर्वेक्षण हे फारच किरकोळ आहे. जिल्हा आणि गावांपर्यंत याचा अभ्यास केला जात नाही. हिमाचल प्रदेश सोडल्यास इतर कोणत्याही राज्यात अशा प्रकारे विस्तृत मूल्यांकन करण्यात आलेलं नाही.
...तर येत्या 10 वर्षांत पुरात जातील 16000 लोकांचे जीव, 47000 कोटींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 9:18 AM