अहमदाबाद – गुजरातचेमुख्यमंत्री विजय रुपाणी(Vijay Rupani) यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विजय रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला. रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरातचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपाचे अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. या नेत्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांच्याही नावाचा समावेश आहे.
गुजरातच्या पुढील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत मनसुख मंडाविया यांच्यासह केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, चंद्रकांत पाटील(CR Patil) यांचं नाव चर्चेत आहे. मनसुख मंडाविया यांना जुलै महिन्याच्या मोदी कॅबिनेट विस्तारात स्थान देऊन डॉ हर्षवर्धन यांच्याजागी आरोग्य मंत्रालयाची धुरा सांभाळायला दिली. तर गोरधन जदाफिया यांच्याही नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहे.
गुजरातमध्ये पटेल समुदायाचं महत्त्व
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत येण्यामागे एक कारण म्हणजे ते पटेल समुदायातून येतात. गुजरातच्या राजकारणात पटेल समुदाय महत्त्वाची भूमिका निभावतो. पटेल समुदायात कदवा आणि लेउवा पटेल असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट विस्तारात दोन्हीही पाटीदार समाजाला स्थान दिलं आहे. पुरुषोत्तम रुपाला कदवा पाटीदार आणि मनसुख मंडाविया लेउवा पाटीदार आहेत. परंतु आता हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला? लिहून आणलेलं उत्तर विजय रुपाणींनी वाचून दाखवलं, म्हणाले...
चंद्रकांत उर्फ सी आर पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू
सीआर पाटील हे प्रभावशाली खासदार म्हणून ओळखले जातात. त्याच्या मतदारसंघातील विकास कामांना प्रमोट करण्याबाबत ते माहीर आहेत. गुजरात भाजपाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २८१ सदस्यांची जम्बो कार्यकारणी बनवली त्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून चंद्रकांत पाटलांना ओळखलं जातं.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला?
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी यामागचं कारण देखील स्पष्ट केलं. यासाठी ते एक पत्रकच घेऊन आले होते. लिहून आणलेली माहिती त्यांनी वाचून दाखवली. "गुजरातच्या विकास यात्रेत मला योगदान देण्याची संधी मिळाली. मला दिलेल्या जबाबदारीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो", असं विजय रुपाणी म्हणाले. तसेच भाजपा हा एक संघटना आणि विचारधारांवर चालणारा असल्यामुळे कालानुरुप संघटनेत कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होत असतात अशी भाजपाची परंपरा आहे. जी जबाबदारी दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडण्याचं काम पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता करतो हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. पक्षाकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पक्ष संघटनेत नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी काम करण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे", असंही रुपाणी यांनी म्हटलं आहे.