ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३१ - जनतेसोबत संवादाच्या अभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारसारखी स्थिती होईल, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील निवडणुकीत भारतीय जनता त्यांना धूळ चारेल, असा टोलाही त्यांनी मोदींचे नाव न घेता लगावला. पणजी येथील एका महाविद्यालयात आयोजित ‘डिफिकल्ट डायलॉग‘ या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख न करता सरकारवर टीकास्त्र सोडले.
' जनतेशी संवाद साधणे, ही भारतीय लोकशाहीची मोठी ताकद आहे. पण, सध्या तसे होताना दिसत नाही... संवाद बिलकूल राहिलेला नाही. थोड्याफार चुका होऊ शकतात, पण सध्याची स्थिती बघता काळजी वाटते' असे सिन्हा म्हणाले. ' भारतीय समाज सगळं लक्षात ठेवतो आणि याच गोष्टीचा भविष्यात फटका बसू शकतो. संवादावर विश्वास नसणा-यांना भारतातील नागरिक पुढील निवडणुकांमध्ये धूळ चारतील. इंदिराजींच्या काळातही अशीच डोळेझाक केली होती आणि त्यावेळी सरकार फक्त १९ महिनेच टिकू शकले होते,' याची आठवणही सिन्हा यांनी करून दिली.