राहुल गांधींवरील खटल्याची पुढील सुनावणी ६ मार्चला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 07:55 IST2025-02-25T07:55:39+5:302025-02-25T07:55:49+5:30
राहुल गांधी यांचे वकील काशीप्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याची ११ फेब्रुवारी रोजी उलटतपासणी झाली होती.

राहुल गांधींवरील खटल्याची पुढील सुनावणी ६ मार्चला
सुलतानपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या बदनामीच्या खटल्याची पुढील सुनावणी ६ मार्चला घेण्याचे खासदार/आमदार विशेष न्यायालयाने ठरविले आहे. २०१८ साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केला.
राहुल गांधी यांचे वकील काशीप्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याची ११ फेब्रुवारी रोजी उलटतपासणी झाली होती. ती पूर्ण झाल्यावर सोमवारी या याचिकेची सुनावणी होणार होती. पण याचिकाकर्त्याचे वकील संतोष कुमार पांडे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल दाखल झालेल्या खटल्यात सुनावणीप्रसंगी ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत न्यायालयाकडून राहुल गांधी यांना वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२३मध्ये ते न्यायालयात उपस्थित राहिले होते. विशेष न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना २५ हजार रुपयांच्या दोन हमीपत्रांवर जामीन मंजूर केला. (वृत्तसंस्था)