अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपासून आम आदमी पार्टी भाजपा आणि केंद्र सरकारवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दावा केला की, भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर सौरभ भारद्वाजही आता मीडियासमोर आले आणि म्हणाले की, रामलीला मैदानावरील रॅलीमुळे भाजपा अस्वस्थ झाली आहे आणि आमच्या आणखी नेत्यांना अटक करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पुढचा नंबर माझा आणि मग आतिशी यांचा आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले, "जेव्हा आम्ही 31 मार्चच्या रॅलीपूर्वी चर्चेला बसलो होतो, तेव्हा लोकांमध्ये शंका होत्या. सिसोदिया आणि संजय सिंह जेलमध्ये आहेत, अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. या रॅलीसाठी लोक येणार का?, लोकांचा आपवर विश्वास आहे का? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर लोकांची गर्दी पाहून भाजपाला धक्का बसला कारण विरोधी पक्षांचे सर्व मोठे नेते मंचावर जमले होते."
"आम्ही या नेत्यांना फोन करून सांगितलं की, आमचे नेते तुरुंगात आहेत. आम्ही दिल्लीत मोठी रॅली काढत आहोत. आमच्याकडे या लोकांचे नंबरही नव्हते. आम्ही लोकांना फोन करून त्यांचे नंबर मागितले. तेव्हा ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. आम्ही नक्की येऊ. इतके मोठे नेते आले की आता भाजपाला काळजी वाटू लागली आहे. भाजपाने सर्व काही केले आणि आमच्या नेत्यांना अटक केली, तरीही पक्ष उभा आहे आणि आता पक्ष भक्कमपणे उभा आहे हे जनतेला देखील समजलं आहे."
"दादागिरी झाली आता गुंडगिरी उघडपणे सुरू” केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना सौरभ भारद्वाज यांनी "दादागिरी झाली आता गुंडगिरी उघडपणे सुरू आहे. जरी मी हे म्हटलं नाही तरी संपूर्ण देशातील जनतेला हे माहीत आहे की त्यांना धमकावून यांना राज्य करायचं आहे. अतिशीने पत्रकार परिषदेत सांगितलं की, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून ऑफर आली आहे. जर तुम्ही पक्ष सोडला तर तुमचं चांगलं करियर बनवू. पण जर सोडला नाही तर महिन्याभरात जेलमध्ये जाल. अशी उघड धमकी" दिल्याचं म्हटलं आहे.
"'आप' भाजपाच्या स्वप्नात येते"
“आम्ही विचार केला होता की, केजरीवाल यांच्या अटकेनंतर चार दिवस पक्ष कसा चालेल? मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दुसरे नेतृत्व म्हणून आले तेव्हा त्यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं. राघव चड्ढा, आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या नेतृत्वाची तिसरी फळी समोर आली. तर आता तिसऱ्या नेतृत्वाला जेलमध्ये टाकलं तर चौथे नेतृत्व समोर येईल. रामलीला मैदानातून उदयास आलेला हा पक्ष असून साहजिकच नेतृत्व उदयास येणार आहे. आज आम आदमी पार्टी भाजपाच्या स्वप्नात येते. 'आप' हा आज भाजपाचा शत्रू क्रमांक एकचा पक्ष आहे” असंही सौरभ यांनी म्हटलं आहे.