महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : बडोद्यानंतरचे पुढचे संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे अशी इच्छा आहे. या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, आणि संमेलनाचे अनुदानही निश्चितच वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.बडोदे येथे सुरू झालेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.तावडे म्हणाले, ‘‘अनेकदा मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांच्या मागण्यांविषयी विचारताना आपण गल्लत करतो. हे तीनही वेगवेगळे घटक असून त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरु आहेत, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. येत्या २७ फेब्रुवारीला असणाºया मराठी भाषा गौरव दिनी संगणकावर मराठी भाषेविषयीचे प्रकल्प हाती घेणार आहोत.डॉ. रघुवीर चौधरी म्हणाले, 'देशात नवजागरणाची सुरुवात ज्ञानदेवांपासून झाली. आजचे सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न सोडवायचे असतील तर महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश यांचे स्मरण करावे लागेल. सध्या भारतीय भाषाची दुर्दशा, उपेक्षा होत आहे. इंग्रजीला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे. अशा वेळी भारतीय भाषा बारावीपर्यंत अनिवार्य करणे गरजेचे आहे. भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आदानप्रदान कायम ठेवण्यासाठी जीवनदृष्टी आणि सर्जनशीलता वाढवणे गरजेचे आहे.‘यंदाचे संमेलन विदर्भात व्हावे, यासाठी महामंडळाने आग्रह धरला असताना, मी बृहन्महाराष्ट्राचा आग्रह धरला' असे सांगत डॉ. काळे यांनी श्रीपाद जोशी यांना घरचा आहेर दिला. ते म्हणाले, 'मराठी अस्मिता, संरक्षण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी बोलण्यापुरती मर्यादित राहिली आहे. भाषा आजवर केवळ आंतरिक चेतनेमुळे टिकून राहिली आहे.भाषेच्या नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर अवलंबून राहण्यापेक्षा भाषेच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी पूर्वप्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंत मराठी अनिवार्य करणे आवश्यक आहे.'श्रीपाद जोशी म्हणाले, ‘मराठीच्या अभिजाततेची कागदपत्रे अद्याप केंद्राच्या दारात उभी आहे. मराठी विद्यापीठाची मागणीही प्रलंबित आहे. ११० वर्षांनीही मराठीची स्थिती बिकटोत्तम आहे. भाषेच्या रक्षणासाठी राजकीय पाठबळ, धोरण नाहीच; मात्र लोकइच्छाशक्तीही महत्त्वाची आहे.मराठीची आणि साहित्याची वाट सुकर करण्यासाठी धोरणात बदल होणे आवश्यक आहे. निवडणुका जवळ आल्या असून, आम्हाला उपकृत करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत तुमची सत्ता अबाधित राहो, असा टोलाही जोशी यांनी फडणवीस आणि तावडे यांना लगावला.संमेलनातून दोन्ही राज्यांचे नवे अनुबंध निर्माण होतीलसाहित्य संमेलनातून महाराष्टÑ आणि गुजरात या दोन्ही राज्यांचे नवे अनुबंध तयार होतील, अशी अपेक्षा संमेलनाच्या स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या साहित्यात सत्य, सौंदर्य आणि हित यांचे मिलन होते, ते खरे परिपूर्ण साहित्य होय. समाजात लेखनकला ही महत्त्वाची भूमिका पार पडत असते, कारण यातूनच श्रेष्ठ कलाकृती निर्माण होत असतात.महाराजा गायकवाड महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये आले तरीही त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कधीच तोडले नाही. त्यांनी कायम दोन्ही साहित्य-संस्कृतींना एकजुटीने पुढे नेले. महाराजा गायकवाड यांनी कायमच मराठी आणि गुजराती भाषेतील समन्वय जपला, त्यामुळे आजही कित्येक वर्षांनंतर ही बडोद्याची खासियत आहे. या संमेलनाचा मान बडोद्याला मिळाला आहे, हा महाराजा गायकवाड यांचा सन्मानच आहे. त्यामुळे या संमेलनातून दोन्ही राज्यांचे नवे अनुबंध निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
पुढील संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारला व्हावे- विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:31 AM