पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:32 PM2024-06-18T17:32:01+5:302024-06-18T17:33:22+5:30

प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदीय राजकारणात उतरणार असून वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Next time Robert Vadra will appear in Parliament?; Priyanka Gandhi will contest from Wayanad, Robert Vadra first reaction | पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

नवी दिल्ली - प्रियंका गांधी या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. माझ्या आधी तिने संसदेत पोहचावं असं मला वाटतं हे विधान प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी यंदाच्या निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या जागांवर निवडणूक लढवली. त्यातील दोन्ही जागांवर ३ लाखांच्या मताधिक्याने राहुल गांधी विजयी झाले. मात्र नियमानुसार १४ दिवसांत त्यांना दोन्ही पैकी १ जागा सोडावी लागणार होती. त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला तर याच जागेवर प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसनं ठरवलं.

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी उभ्या राहणार असून त्याबाबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं की, प्रियंका ज्याप्रकारे मेहनत घेत आहे, ती खासदार म्हणून देशाला प्रगतीपथावर नेईल. मीदेखील तिला निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकला. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला. प्रियंका गांधी वायनाडमधून लढतेय त्याचा आनंद आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा प्रियंकाने संसदेत पोहचले पाहिजे असं वाड्रा यांनी सांगितले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच प्रियंकाने आधी संसदेत पोहचावं ही माझी इच्छा होती. मी मेहनत करत राहीन, पुढील निवडणुकीत भाग घेईन. मी प्रियंकाला तू संसदेत जायला हवं हे समजावलं. कुटुंबाने एकत्रित निर्णय घेतला असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं. त्याशिवाय घराणेशाहीच्या आरोपावर आधी भाजपाने स्वत:कडे पाहावे. त्यांच्या पक्षात घराणेशाही असणारे नेते भरलेत. जनतेनं अबकी बार ४०० पारचं वास्तव दाखवलं. भाजपा अयोध्येतही हरली. राम मंदिर बनवलं परंतु लोकांची घरे उद्ध्वस्त केली. रोजगार दिले नाहीत. भाजपा नेत्यांचा अहंकार लोकांच्या पसंतीस पडला नाही अशी टीका वाड्रा यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी उत्तरेत आणि प्रियंका गांधी दक्षिणेत प्रतिनिधित्व करणार आहेत. राहुल वायनाडला आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात येत राहतील. त्यामुळे संपूर्ण देशाची माहिती मिळेल. जेव्हा प्रियंका गांधी संसदेत पहिल्यांदा बोलायला उभ्या राहतील तेव्हा माझ्या अंगावर काटा येईल. मला तिच्या भाषणाची उत्सुकता आहे असंही रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.

राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते व्हावं

राहुल गांधी पूर्ण क्षमतेनं आणि मेहनतीनं त्यांचं काम करतायेत. त्यांनी नक्कीच विरोधी पक्षनेते बनायला हवं. पंतप्रधानपद हे आघाडी ठरवेल. आम्ही कुठल्याही पदाविषयी विचार करत नाही परंतु जर ते देशाचे पंतप्रधान झाले तर चांगलेच होईल असा विश्वास रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केला.

कधीही पलटू शकतात नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कधीही एनडीएची साथ सोडू शकतात. चंद्राबाबू नायडूही खुश नाहीत. हे सरकार मजबूत नाही तर विरोधी पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला विचारात घेतल्याशिवाय सरकार कुठलाही निर्णय करणार नाही असंही रॉबर्ट वाड्रा म्हणाले.  
 

Web Title: Next time Robert Vadra will appear in Parliament?; Priyanka Gandhi will contest from Wayanad, Robert Vadra first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.