नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. हे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरनंतरच बोलावण्यात येईल, अशी शक्यता आहे.‘संसदेचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरनंतर कोणत्याही दिवशी बोलावले जाण्याची शक्यता आहे, परंतु त्या बाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज कमिटीच्या २६ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात येईल,’ अशी माहिती एका सरकारी पदाधिकाऱ्याने सीसीपीएच्या बुधवारच्या बैठकीनंतर दिली. सरकारने २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिवस’ साजरा करण्याचे ठरविले आहे. हा दिवस कसा साजरा करायचा, यावर सीसीपीएच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू, वित्तमंत्री अरुण जेटली आणि कायदामंत्री सदानंद गौडा उपस्थित होते. राज्यसभेत ५३ विधेयके प्रलंबित आहेत. त्यांपैकी आठ विधेयके लोकसभेने पारित केली आहेत, तर पाच विधेयके विविध संसदीय समित्यांकडे प्रलंबित आहेत. ही विधेयके पारित कशी करता येतील, यावरही या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. (वृत्तसंस्था)
अधिवेशनाबाबत पुढील आठवड्यात निर्णय
By admin | Published: October 23, 2015 2:54 AM