ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - पुढच्या वर्षी आयपीएलचे सामने विदेशात भरवण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचा गौप्यस्फोट भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे. आधी महाराष्ट्रात आणि नंतर राजस्थानमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होणारा आयपीएलच्या सामन्यांना विरोध बघता या शक्यतेची चाचपणी बीसीसीआय करताना दिसत आहे.
महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलसाठी मैदानांवर बहुमोलाचे पाणी कसे उधळता येऊ शकते, या मताला पाठिंबा दर्शवत कोर्टाने राज्यातले आयपीएल सामने अन्यत्र हलवण्याचा आदेश दिला. मागोमाग, जयपूरमध्येही हे सामने होऊ देऊ नयेत यासाठी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती आहे, तर दुसरीकडे आयपीएलच्या माध्यमातून मिळणारं कोटी रुपयांचं घबाड आहे.
त्यामुळे दुष्काळ असताना पाण्याचा अपव्यय केला हा आरोपही होणार नाही, आणि विदेशात सामने भरवून आर्थिक रसद सुरू ठेवली जाईल, असा दुहेरी विचार बीसीसीआय करत असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत.
यासंदर्भात, ठोस काही अद्याप ठरले नसले तरी बीसीसीआय पुढच्या वर्षीचे आयपीएलचे सामने विदेशात भरवण्याची शक्यता आजमावत असल्याचा गौप्यस्फोट ठाकूर यांनी केला आहे.